महाराष्ट्रात वर्षभरात 2 लाखांपेक्षा अधिक आर्थिक घोटाळ्यांची नोंद, नागरिकांना तब्बल 38 हजार कोटी रुपयांना गंडा

Financial Fraud Cases : तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरासोबतच गेल्याकाही वर्षात आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. केवळ महाराष्ट्रात वर्ष 2024 मध्ये तब्बल 2,19,047 आर्थिक फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये जवळपास 38,872.14 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.

राज्याच्या गृह विभागाने ही आकडेवारी दिली आहे. सर्वाधिक आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये मुंबई आघाडीवर आहे. तर या यादीत पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईत वर्ष 2024 मध्ये एकूण 51,873 आर्थिक फसवणुकीचे प्रकार समोर आले असून, त्यामध्ये नागरिकांची 12,404.12 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये पुणे शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे. शहरात 22,059 घटना घडल्या असून, यामध्ये नागरिकांची 5,122.66 कोटी रुपयांची फसवणूक झाली. संपूर्ण पुणे जिल्ह्यात 42,802 फसवणुकीच्या घटना घडल्या. यात पिंपरी-चिंचवडमध्ये 16,115 घटना आणि पुणे ग्रामीण भागात 4,628 घटना घडल्या. यामध्ये अनुक्रमे 3,291.25 कोटी रुपये व 434.35 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

मुंबई आणि पुणे पाठोपाठ फसवणुकीच्या घटनांमध्ये ठाणे पुढे आहे. ठाणे जिल्ह्यात एकूण 35,388 प्रकरणांची नोंद झाली आहे. नागपूर शहरात 11,875 आणि नागपूर ग्रामीण भागात 1,620 फसवणुकीच्या घटना घडल्या असून, यात एकूण 1,491.07 कोटी रुपयांना गंडा घालण्यात आला. या पाठोपाठ  नाशिकमध्ये 9,169, छत्रपती संभाजीनगरमध्ये 6,090 आणि अमरावतीमध्ये 2,778 आर्थिक फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत.