First Island Airport : मुंबईजवळील कृत्रिम बेटावर लवकरच नवीन विमानतळाची निर्मिती केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या पायाभूत सुविधा विकासाचा एक भाग म्हणून मुंबईजवळ पहिले ऑफशोर विमानतळ तयार केले जाणार आहे. याच्या निर्मितीनंतर हे समुद्रामध्ये बांधण्यात आलेले पहिले विमानतळ असेल.
हे प्रस्तावित विमानतळ देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील वाढवण बंदराच्या जवळ, सुमारे 125 किमी अंतरावर असलेल्या कृत्रिम बेटावर उभारले जाणार जाणार आहे. या प्रकल्पाची रचना हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ओसाका येथील कान्साई आंतरराष्ट्रीय विमानतळासारख्या ऑफशोर विमानतळांच्या धर्तीवर केली जाण्याची शक्यता आहे.
या योजनेला गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत केंद्रीय पर्यावरण आणि संरक्षण मंत्रालयांसह महाराष्ट्र सरकारकडून प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीनंतर भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (AAI) सहकार्याने प्राधिकरण अभ्यास सुरू करतील. त्यानंतर प्रकल्पासाठी अंदाजित खर्चाचा आकडा समोर येईल.
पूर्ण झाल्यानंतर वाढवण विमानतळ महाराष्ट्राचे तिसरे प्रमुख विमानतळ बनेल. प्रस्तावित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन तसेच दोन प्रमुख महामार्ग मुंबई-नवी दिल्ली आणि मुंबई-वडोदरा या विमानतळाला जोडले जातील. या विमानतळामुळे मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विमानतळावरून हवाई प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढवणे देखील महत्त्वाचे असेल.