मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचे सूत्र ठरले असल्याचे दोन दिवसांपूर्वी दिल्लीत सांगितले होते. त्यानंतर 14 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. परंतु महायुतीच्या घटक पक्षांमध्ये खातेवाटपाची चर्चा आणि वाटाघाटी सुरूच आहेत. त्यामुळे आज शपथविधी तर झाला नाहीच, पण आता मान्यतेसाठी महायुतीच्या तीनही पक्षांच्या खाती व मंत्र्यांच्या याद्या दिल्लीत पाठवल्या आहेत. याचा अर्थ केवळ भाजपा नाही तर शिंदे व अजित पवार गटाच्या मंत्र्यांच्या नावाची मान्यता भाजपाचे ज्येष्ठ नेते देणार आहेत. दिल्लीहून हिरवा कंदील मिळत नाही तोवर शपथविधी होणार नाही.
उद्या नागपुरात शपथविधी होणार असे सांगितले जात असले तरी त्याबद्दल कुणीही कसलेच वक्तव्य केले नसल्याने तो उद्याच होईल, याबाबत खात्रीने सांगता येत नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल लागून जवळपास तीन आठवडे उलटून गेले आहेत. मात्र, अद्याप मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुहूर्त सापडलेला नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी निकालानंतर 12 दिवसांनी शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार रखडलाच आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाला अवघा एक दिवस उरला असतानाही मार्ग निघाला नाही. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल चर्चा सुरु आहे. पण निर्णय होत नाही. आता सोमवार 16 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शपथविधी होईल, असे म्हटले जात आहे. दिल्लीतील नेतृत्वाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यांच्या अंतिम मान्यतेसाठी मंत्रिमंडळ विस्तार थांबलेला आहे. आज किंवा उद्या दिल्लीहून मंत्रिमंडळ विस्ताराला मान्यता मिळाल्यानंतर शपथविधी होईल.
काल रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी पाऊण तास बैठक झाली. या बैठकीत मंत्र्यांची नावे अंतिम झाल्याचे सांगण्यात येते . महायुतीतील तिन्ही पक्षांच्या आमदारांची यादी आता तयार झाल्याचे सांगितले जात आहे. शिंदे आणि पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपापल्या मंत्र्यांची यादी फडणवीस यांच्याकडे दिली आहे. फडणवीस यांनी एकत्रित यादी दिल्लीला पाठवली आहे. दिल्लीतून त्यावर शिक्कामोर्तब झाल्यावरच शपथविधीची घोषणा केली जाणार आहे. दरम्यान, फडणवीस आणि शिंदे यांच्या निवासस्थानी आजही इच्छुक आमदारांची रीघ लागली होती. शिवेंद्रराजे भोसले, राहुल आवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिंदे गटाचे संजय शिरसाठ, माजी मंत्री संजय राठोड, कुमार आयलानी, संतोष दानवे, नमिता मुंदडा, जयदत्त क्षीरसागर, बंटी बागडिया अशा सर्वपक्षीय आमदारांनी मंत्रिपदासाठी फडणवीस यांची भेट घेतली.
महायुतीत ठरलेल्या सूत्रानुसार, भाजपाला 21, शिंदे गटाला 12 आणि अजित पवार गटाला 10 मंत्रिपदे मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यात यापैकी किती जणांचा शपथविधी होणार हे जाहीर झालेले नाही. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, बबन लोणीकर, पंकजा मुंडे, आशिष शेलार, संभाजी निलंगेकर, जयकुमार रावल, गोपीचंद पडळकर , शिवेंद्रराजे भोसले, नीतेश राणे, विजयकुमार गावित, देवयानी फरांदे, राहुल कुल, माधुरी मिसाळ, संजय कुटे यांची नावे आहेत. एकनाथ शिंदे गटाकडून शंभुराज देसाई, दादा भुसे, संजय शिरसाट, भरत गोगावले, गुलाबराव पाटील, उदय सामंत, प्रताप सरनाईक, विजय शिवतारे, योगेश कदम, राजेंद्र यड्रावकर, प्रकाश आबिटकर यांची नावे चर्चेत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, संजय बनसोडे, धर्मरावबाबा आत्राम, अनिल पाटील, नरहरी झिरवळ, मकरंद पाटील, दत्तात्रेय भरणे, संग्राम जगताप, इंद्रनील नाईक, सना मलिक यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. पण सध्या ही केवळ चर्चा आहे .
फडणवीसांच्या स्वागताची
नागपूरमध्ये जय्यत तयारी
विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या नागपूरला जाणार आहेत. मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे प्रथमच नागपुरात येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे. फडणवीस हे नागपूर विमानतळावर दाखल झाल्यानंतर विमानतळ ते त्यांच्या निवासस्थानापर्यंत स्वागत रॅली काढली जाणार आहे.
ठिकठिकाणी पुष्पवृष्टीसह ढोलताशाच्या गजरात त्यांचे स्वागत केले जाणार आहे. शहरात त्यांच्या स्वागताचे मोठ्या प्रमाणावर बॅनरही लावले आहेत. नागपुरातील देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या त्रिकोणी पार्क परिसरातील प्रत्येक घरावर विशेष रोषणाई करण्यात आली आहे. त्यांच्या स्वागतासाठी परिसरातील नागरिकांनी संपूर्ण परिसरामध्ये रांगोळ्या काढून दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.