महाबळेश्वर येथे उभारण्यात आले देशातील पहिले ‘हनी पार्क’

Honey Park in Mahabaleshwar : महाराष्ट्रातील पहिल्यावहिल्या हनी पार्कचे उद्घाटन महाबळेश्वर येथे करण्यात आले आहे. या पार्कला ‘मधुबन प्रकल्प’ असे नाव देण्यात आले असून, एव्हरेस्ट इंडस्ट्रीज ग्रुप आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या संयुक्त सहयोगातून हा प्रकल्प साकारण्यात आला आहे.

मध उत्पादन आणि ग्रामीण उद्योग विकासाच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हे हनी पार्क तीन एकर क्षेत्रामध्ये विस्तारित आहे. सीएसआर उपक्रमांतर्गत सहा लाख रुपयांच्या निधीतून हे पार्क उभारण्यात आले आहे.

या पार्कमध्ये 30 मधमाश्यांच्या पेट्या, मध संकलन यंत्रे, प्रक्रिया उपकरणं, मधमाश्यांचा समूह पकडण्यासाठी जाळी, राणी मधमाशी संगोपन उपकरणं, परागकण सापळे आणि मधमाश्यांसाठी आवश्यक संसाधने उपलब्ध आहेत.

हे पार्क मध उत्पादनाबाबत शिक्षण देण्यासाठी एक व्यापक मंच प्रदान करणार आहे. शेतकरी, मधपालक, विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी येथे एकाच ठिकाणी मध उत्पादनांसंदर्भातील माहिती उपलब्ध असेल.

महाबळेश्वर येथील हनी संचालनालयाला मध उत्पादनासाठी एक आघाडीचे उत्कृष्ट केंद्र (सेंटर ऑफ एक्सलन्स) म्हणून विकसित करण्याचा दीर्घकालीन दृष्टिकोन आहे. याशिवाय, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली, मुंबई येथे दुसरे मधुबन हनी पार्क उभारण्यात येणार आहे.   

महाबळेश्वरमधील हनी पार्कमध्ये स्थानिक आदिवासी महिलांना प्रशिक्षण देऊन पार्कमधील विविध भूमिकांसाठी त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.