महाबळेश्वर – येथील तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात काल गुरुवारी पांढऱ्या रंगाच्या दुर्मिळ शेकरूचे दर्शन झाले. याआधीही महाबळेश्वरच्या जंगल परिसरात शेकरूचे दर्शन झाले होते.
महाबळेश्वर येथील जंगल परिसरात अनेक वन्यजीवांचे अस्तित्व असून त्यात प्रमुख आकर्षण शेकरूचे आहे. खारीपेक्षा आकाराने मोठी असणारी खार म्हणजे शेकरू . या भागात झाडाच्या फांद्यांवरून उड्या मारताना त्याचे दर्शन होते. झाडावरील फळे हा त्याचा मुख्य आहार असतो. झाडाच्या सुरक्षित उंचीवर सुक्या काटक्यांच्या सहाय्याने ती आपले घरटे बांधते.अनेकदा वन्य प्राण्यांमध्ये मेलानिनच्या कमतरतेमुळे त्वचेचा रंग अर्धवट पांढरा किंवा पूर्ण पांढरा होत असतो. या प्रकारच्या दुर्मिळ अशा पांढऱ्या शेकरूचे दर्शन क्वचितच होते.