पिंपरी – पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत आजच्या तरुण पिढीला प्रबोधन व्हावे, गणेशोत्सव हा आपल्या अस्मितेचा, परंपरेचा आणि संस्कृतीचा ठेवा जतन करता यावा यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत यंदा प्रथमच मनपा शाळांमध्ये “इको-फ्रेंडली गणेशमूर्ती” निर्मिती आणि सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पारंपरिक पद्धतींकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेतर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
इयत्ता 5 वी ते 10 वी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शालेय स्तरावर ही “इको-फ्रेंडली गणेशमूर्ती” स्पर्धा घेण्यात येणार आहे. गणेशमुर्ती तयार करणे आणि सजावट या दोन प्रकारांमध्ये स्पर्धा होईल. त्यात माती, कागद आणि नैसर्गिक तंतू यांसारख्या नैसर्गिक साहित्याचा वापर करून गणपतीच्या मूर्ती तयार करणे आवश्यक आहे. तसेच, सजावट या प्रकारात पुर्नवापरातील साहित्य, नैसर्गिक घटक आणि जैवविघटनशील पदार्थांसह उत्सवाची सजावट आवश्यक आहे. स्पर्धेतील व्यापक सहभाग आणि पर्यावरणपूरक पद्धतींचे पालन करण्यासाठी प्रत्येक सहभागी शाळेत एक इको- क्लब तयार करण्यात येणार आहे.