महात्मा गांधींच्या पणतीचे ९२ व्या वर्षी निधन

गांधीनगर – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पणती नीलमबेन पारिख(९२) यांचे काल नवसारी येथील निवासस्थानी निधन झाले. आज त्यांच्यावर वीरवाल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.महात्मा गांधींचा मोठा मुलगा हरिलाल गांधी आणि त्यांच्या पत्नी गुलाब यांना पाच मुले होती. त्यापैकी रामीबेन यांच्या नीलमबेन कन्या होत्या.
गांधीवादी विचारसरणीच्या अनुयायी असलेल्या नीलमबेन यांनी महिला आणि मानवी कल्याणाच्या कार्यात महत्वाचे योगदान दिले होते. दक्षिणपथ आदिवासी महिलांच्या उद्धारासाठी प्रामुख्याने नीलमबेन यांनी त्यांचे आयुष्य अर्पण केले होते. या आदिवासी महिलांना स्वावलंबन शिकवणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले. महात्मा गांधी आणि त्यांचा मोठा मुलगा हरिलाल यांच्यातील मतभेदांवर नीलमबेन पारिख यांनी एक पुस्तक लिहिले होते ज्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या.