वॉशिंग्टन- इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सची पोलारिस डॉन अंतराळ मोहीम पूर्ण झाली असून या मोहिमेतील चारही अंतराळवीर आज सुखरूप पृथ्वीवर उतरले. या अंतराळवीरांनी एलन मस्क यांच्या फाल्कन ९ रॉकेटमधून १० सप्टेंबर रोजी अंतराळात उड्डाण केले होते. ही जगाच्या इतिहासातील पहिलीच खाजगी अंतराळ मोहीम आहे.
पोलारिस डॉन या ५ दिवसांच्या मोहिमेत ४ अंतराळवीरांनी स्पेसवॉक केले. या अंतरापर्यंत गेल्या ५० वर्षात कोणताही अंतराळवीर गेला नव्हता. या मोहिमेत स्पेसवॉकसह मानवी आरोग्याशी संबंधित ३६ विषयांवर संशोधन व प्रयोग करण्यात आले. १२ सप्टेंबर रोजी या अंतराळवीरांनी स्पेसवॉक केला होता. हे अंतराळयान फ्लोरिडाच्या ड्राय टॉर्टुगासच्या पाण्यात उतरले. पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करताना या अंतराळयानाचा वेग ताशी २७ हजार किलोमीटर होता. वातावरणाच्या घर्षणामुळे अंतराळयानाचे तापमानही १९०० अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. अंतराळयान समुद्राजवळ आल्यानंतर पॅराशुटच्या सहाय्याने अंतराळवीरांचे कॅप्सुल पाण्यात अलगद उतरवण्यात आले. त्यावेळी तैनात असलेल्या बोटींवरून अंतराळवीरांना जमीनीवर आणण्यात आले. ज्या फाल्कन ९ या रॉकेटच्या सहाय्याने या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले, त्या रॉकेटचा पुनर्वापरही करता येणार आहे.