मविआने एकजुटीची शक्ती दाखवत रणशिंग फुंकले मुख्यमंत्री कुणीही असो! माझा पाठिंबा! उद्धव ठाकरेंनी वाद मिटवला

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आज महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी एकत्र येऊन एकजुटीची ताकद दाखवित विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी रणशिंग फुंकले! 90 दिवस कष्ट करून या भ्रष्ट, बेकायदा सरकारला खाली खेचा, अशी ललकारी शरद पवार, उद्धव ठाकरे, पटोले यांच्यापासून प्रत्येक नेत्याने दिली. मविआत वाद होणार नाही असे म्हणत उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्रिपदाचा वाद नाही. शरद पवार, पटोले यांनी कुणाचेही मुख्यमंत्रिपदासाठी नाव द्यावे, माझा त्यांना पाठिंबा आहे.
महाविकास आघाडी पदाधिकार्‍यांच्या षण्मुखानंद हॉल येथे झालेल्या मेळाव्यात भाषण करताना उध्दव ठाकरे यांनी रोखठोक विचार मांडले. ते म्हणाले की, आताची लढाई स्वाभिमान जपण्याची आहे. मला उमेदवारी मिळाली नाही तरी चालेल, पण यांना खाली खेचायचे आहे. मुख्यमंत्री कोण असा प्रश्न विचारतात. मी आताच सांगतो की, शरद पवारांनी, पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्री कोण होईल ते आता जाहीर करावे, मी आता त्यांना पाठिंबा देतो. ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असे सेना-भाजपा युतीवेळी प्रत्येक बैठकीत ठरायचे. पण त्यामुळे पाडापाडीचे राजकारण होत होते. तुझा मुख्यमंत्री नको, म्हणून सीट पाडायच्या, हे यावेळी नको. आता मुख्यमंत्री जाहीर करायचे तर करा.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर सेक्युलर नागरी कायद्यावरून टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, आता तुम्हाला सेक्युलर शब्द आठवला म्हणजे तुम्ही हिंदुत्व सोडले का? हिंदुत्व न मानणार्‍या चंद्राबाबू, नितीश कुमारांच्या मांडीला मांडी लावून बसलात, मग तुम्ही हिंदुत्व सोडले नाही का? मग उगाच आगी लावण्यासाठी म्हणून वक्फ बोर्डाचे विधेयक आणले. जर आणले असेल तर बहुमताच्या जोरावर ते मंजूर का केले नाही?
राज्यात लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये आणि यांच्या योजना सर्वांपर्यंत पोहोचवायला दहा हजार रुपये देऊन योजनादूत म्हणून त्यांची चिल्लीपिल्ली नेमतील. आपण आपले दूत बनूया. त्यांचे निवडणूक लांबविणे सुरू आहे, पालिकेच्या निवडणुका घेतच नाहीत. आता विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
विकासाचे पैसे वळविले
शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील जिल्हा विकासाचे पैसे जाहीर केलेल्या योजनांकडे वळविले जात आहे. हिशेब न करता घोषणा झाल्या आहेत. मी बहिणींना सांगतो की, आम्ही व्यवस्थित योजना करून लाडक्या बहिणींना आता दिली जात आहे त्यापेक्षा अधिक
रक्कम देऊ.
बेकायदेशीर सरकार
जनतेला पाडायचे आहे

काँग्रेसचे बाळासाहेब थोरात म्हणाले की, पुढील दोन महिने कशी झाडाझाडी करायची याची ही सुरुवात आहे. लोकशाही धोक्यात आली, कुणाला घमेंड चढली तर त्याला महाराष्ट्राची जनता जागा दाखवते. राहुलजींचे पहिले भाषण संसदेत झाले तर 56 इंचाची छाती लहान वाटू लागली. आता त्यांना लोकशाही, धर्मनिरपेक्ष, घटना हे शब्द आठवू लागले आहेत. जनता उत्साहात आहे. लोकसभेनंतर त्यांना महाराष्ट्रात बेकायदेशीर सत्तेवर आलेले सरकार खाली खेचायचे आहे.
बहुमत असते तर घटना बदलली असती
आदित्य ठाकरेंनी प्रथमच महत्त्वाच्या सभेत भाषण केले. ते म्हणाले की, भाजपाला पूर्ण बहुमत मिळाले असते तर या एका महिन्यात भाजपाने घटना बदलून स्वतःला पाहिजे ते केले असते. भाजपाचे बहुमत असते तर घरांवर बुलडोझर फिरले असते. लोकशाही संपविण्याची सुरुवात महाराष्ट्रात झाली. त्यांची निवडणूक घेण्याची हिंमत नाही. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात एकही उद्योग आला नाही.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मविआची प्रचाराची सुरुवात आपण आज करीत आहे. काल स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सत्ताधारी आणि विरोधकांना समान स्थान असते. पण काल द्वेषातून विरोधी पक्षनेता असूनही राहुल गांधींना त्यांचे स्थान दिले नाही. हा लोकशाहीचा अपमान आहे, त्यांची घमेंड उतरलेली नाही. दिल्लीत बसलेले दोघे महाराष्ट्रातून पैसा नेऊन महाराष्ट्राला कंगाल करीत आहेत. आपण हे बंद करायला हवे. त्यांच्याकडे शेतकर्‍यांसाठी पैसे नाहीत. कर्मचारी भरती करायला पैसे नाहीत. आम्हाला महाराष्ट्राचे भ्रष्ट सरकार खाली खेचायचे आहे.
पदाधिकारी मेळाव्याचा समारोप शरद पवार यांच्या भाषणाने झाला. ते म्हणाले की, महाराष्ट्राची संकटातून सुटका करायची आहे. महाराष्ट्राचा विचार करावाच लागेल, पण देशावरील संकट अजून गेलेले नाही. संविधानावरील संकट अजून गेलेले नाही. कारण ज्यांच्या हाती देशाची सूत्रे आहेत, त्यांना संवैधानिक संस्था आणि विचारधारा यांच्याबाबत आस्था नाही.
देशाचे पंतप्रधान संसदेची प्रतिष्ठा ठेवत नाहीत. संसद अधिवेशनात ते एक दिवस उपस्थित राहिले नाहीत. पंतप्रधानांची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे तशी विरोधी पक्षनेत्याची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. पण राहुल गांधींना पाचव्या रांगेत बसवले. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना भाजपाच्या सुषमा स्वराज पहिल्या रांगेत बसल्या होत्या. या लोकशाहीच्या संस्थावर या देशाच्या सरकारमध्ये बसलेले विश्वास ठेवत नाहीत. आपल्याला पुढील दोन महिन्यांत परिवर्तनाचा संदेश द्यायला पाहिजे. महाराष्ट्राची चुकीची सत्ता बदलणे, चुकीच्या लोकांच्या हातात असलेली सत्ता बदलणे हे महत्त्वाचे आहे. विरोधकांचे अधिकार उद्ध्वस्त करणारे कायदे आणण्याचा प्रयत्न झाला. सत्तेचा गैरवापर हे त्यांचे सूत्र आहे. त्यांच्याविरुद्ध एकजुटीने लढायचे आहे. त्यासाठी पडतील ते कष्ट करण्याची तयारी ठेवा.

सरड्याने गुलाबी रंग घेतला
संजय राऊतांचा चिमटा

संजय राऊत भाषणाला आले तेव्हा टाळ्या, शिट्ट्यांनी उत्साह वाढला. ते म्हणाले की, आज अटल बिहारी वाजपेयींची पुण्यतिथी आहे. त्यांच्या भाजपाबरोबर आम्ही होतो. आताचा बनावट भाजपा आहे. गेल्या 50 दिवसांत जम्मू काश्मीरमध्ये 17 दहशतवादी हल्ले झाले, त्यामुळे त्यांची 56 इंचाची छाती नाही तर काडेपेटीचे रिकामे पाकीट आहे. आता तर भाऊ गुलाबी झाला आहे. सरड्यासारखा रंग बदलला. पण राजकारणात गुलाबी रंग चालत नाही. लाडकी बहीण योजना की पैशाने मते विकत घेण्याची योजना आहे. आता आपल्याला एकी ठेवून संघर्ष करायचा आहे.

बहिणीची किंमत पराभावानंतर कळली
सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना टोला मारला की, निवडणुका हरल्यानंतर भावांना बहिणीची आठवण झाली. तुतारी आणि मशालची लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली आहे. ही लढाई आम्ही लढणारच आहोत. हक्क मिळायलाच हवा. पुढचे 90 दिवस महत्त्वाचे आहेत. दिल्लीच्या पुढे न वाकणारे स्वाभिमानी सरकार सत्तेवर आणायचे आहे.

महाराष्ट्राच्या निवडणुका
ऑक्टोबर नंतरच होतील

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमारना सवाल करण्यात आला की, हरियाणा व महाराष्ट्राच्या सरकारीची मुदत नोव्हेंबर महिन्यातच संपते आहे. मग महाराष्ट्राचीही निवडणूक आताच घोषित का नाही केली किंवा जम्मू-काश्मीर, हरियाणा निवडणूक प्रक्रियेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या निवडणुकीची घोषणा होईल का?
यावर राजीव कुमार म्हणाले की, महाराष्ट्राची निवडणूक मुदत संपण्याच्या 6 महिन्याच्या मुदतीत आम्ही घेऊच. हरियाणा आणि जम्मू-काश्मीर निवडणूक प्रक्रिया सुरू असताना महाराष्ट्राची निवडणूक जाहीर करता येत नाही. महाराष्ट्रात खूप पाऊस सुरू होता. त्यामुळे आयोगाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यात महाराष्ट्रात गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्र, दिवाळी असे सण आहेत. ज्याची आम्हाला दखल घ्यावी लागेल. याचा अर्थ जम्मू-काश्मीर व हरियाणाचे निकाल ऑक्टोबर महिन्यात जाहीर झाल्यावरच महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होईल आणि दिवाळी नंतरच मतदान होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top