मुंबई- मराठी भाषा वापरलीच पाहिजे अशी मागणी करत मनसैनिक गेले काही दिवस बँका, पोस्ट ऑफिसमध्ये निवेदन देत आहेत. त्यातून वादही झाले. मात्र आज हे आंदोलन थांबवा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केले. मंत्री उदय सामंत यांनी सकाळी राज ठाकरे यांच्याशी या विषयावर चर्चा केली. त्यानंतर आंदोलन थांबविण्याची भूमिका घेण्यात आली.
गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील बँकांमध्ये व इतर ठिकाणी मराठी भाषेच्या वापराचा आग्रह धरला. त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना बँकेतील व्यवहार मराठीत होतात की नाही, याची तपासणी करून निवेदन द्यायला सांगितले. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी विविध बँकांमध्ये जाऊन हिंदी आणि इंग्रजीचे बोर्ड उतरवले आणि मराठीचा आग्रह धरताना काही ठिकाणी बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांना मारहाणही केली. राज्यातील सर्वच जिल्ह्यांत हे आंदोलन सुरू होते. यातूनच बँक कर्मचाऱ्यांना हात लावला तर रस्त्यावर उतरू, असा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ येथे भेट घेतली. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पत्र पोस्ट करत मनसैनिकांना आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले.
राज ठाकरेंनी म्हटले की, सर्वप्रथम महाराष्ट्रात मराठीच्या मुद्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा जो एक जोरदार आवाज उठवलात त्यासाठी तुमचे मनापासून अभिनंदन. मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात तुम्हाला आदेश दिला होता की, महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होत आहेत की नाही हे पाहा आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव त्या बँकेच्या प्रशासनाला करून द्या. दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही महाराष्ट्रात सर्वदूर बँकांमध्ये गेलात, तिथे मराठीचा आग्रह धरलात, हे उत्तम झाले. यातून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना कोणी गृहीत धरू शकत नाही हा संदेश जसा गेला, तसेच सर्वदूर असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक ताकदपण दिसली. पण आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही. कारण आपण या विषयात पुरेशी जागृती केली आहे आणि हे घडले नाही तर काय होऊ शकते याची चुणूक दाखवली आहे. आता मराठी जनतेनेच आग्रह धरायला हवा आणि आपल्या मराठी समाजानेच जर कच खाल्ली, तर मग ही आंदोलने तरी कशासाठी करायची? आणि सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी सरकारची आहे. रिझर्व्ह बँकेचा नियम त्यांना माहीत आहे आणि त्या नियमाची अंमलबजावणी करून घेणे ही आता सरकारची जबाबदारी आहे. काल राज्याचे मुख्यमंत्री माध्यामांशी बोलताना म्हणाले की, आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही. तशी इच्छा आम्हालाही नाही, पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणे पण तुमचेच काम नाही का? तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की. त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांनो, तूर्तास आंदोलन थांबवा, पण या मुद्यावरचे लक्ष हटू देऊ नका! सरकारलाही माझे सांगणे आहे की परत कुठे नियम पाळला जात नसेल आणि मराठी माणसाला गृहीत धरले जात असेल किंवा अपमान केला जात असेल तर पुन्हा तिथे माझे महाराष्ट्र सैनिक त्यांच्याशी चर्चा करायला अवश्य जातील.
मनसेला बॅनरमधून प्रत्युत्तर
मुंबई उपनगरात ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी लावलेले बॅनर सध्या चर्चेत आहेत. या बॅनरवर घाबरू नका, चला मराठी बोलू. मराठी भाषेचा सन्मान करू. आम्ही तुम्हाला मराठी भाषा शिकवू असा संदेश मराठी आणि हिंदी भाषेत लिहिण्यात आला आहे. मराठी शिकण्यासाठी इच्छुक परप्रांतीय व्यक्तींसाठी या बॅनरवर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही देण्यात आले आहेत. मनसेने मारहाण केलेल्या परप्रांतीयांना ठाकरे गटाकडून धीर देण्याचाच प्रयत्न केला आहे.
यावर मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे म्हणाले की, चांगली गोष्ट आहे. ते लोकांना मराठी शिकवणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कायद्यानुसार मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे. बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी आम्ही आग्रही आहोत. जे महाराष्ट्रात मराठी भाषा बोलणार नाहीत आणि अपमान करतील ते देशद्रोही आहेत. ज्यांना मराठीमध्ये बोलायचे नाही ते महाराष्ट्र सोडून जाऊ शकतात.
उदय सामंत-राज ठाकरे भेट
मराठी भाषा मंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी आज पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. याआधी 22 फेब्रुवारी रोजीही दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. या भेटीनंतर उदय सामंत म्हणाले की, मराठी भाषेच्या संदर्भात राज ठाकरेंनी मला भेटायला बोलावले होते. इथे येण्यापूर्वी मी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परवानगी घेऊन आलो आहे. ज्या काही संस्था आहेत, बँका आहेत, त्यात मराठीच्या बाबतीत निर्णय घेतला जातो किंवा त्या ठिकाणी ज्या गोष्टी घडतात, त्याचा प्रतिबंध कसे करायचे, त्यासंदर्भात राज ठाकरेंनी काही सूचना दिल्या. यासंदर्भात मी एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे. त्यात काही सुधारणा करता येतील त्या दृष्टीने निर्णय घेऊ.
