मुंबई – दादरची रहिवाशी असलेल्या मनोरुग्ण महिलेने मंत्रालयात काल संध्याकाळी आरडाओरड करत धिंगाणा घातला. या महिलेने मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दालनात तोडफोड केली. त्यानंतर महिला घटनास्थळावरून फरार झाली. चक्क गृहमंत्र्यांच्याच कार्यालयाची तोडफोड झाल्यामुळे आता पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
मुसळधार पावसामुळे काल सायंकाळी मंत्रालयात फारशी गर्दीही नव्हती आणि कर्मचारी वर्गाची उपस्थितीही कमी होती. साडेसहा वाजता या महिलेने माझी पर्स चुकून मंत्रालयात राहिल्याचे पोलिसांना सांगितले. कोणताही पास न घेता सचिवाच्या दालनातून थेट फडणवीस यांच्या दालनात घुसली आणि आरडाओरडा करायला सुरुवात केली. या महिलेने कुंड्याही फेकून दिल्या. दालनाबाहेर लावलेली फडणवीस यांच्या नावाची पाटी तोडून टाकली. या महिलेला कोणीही रोखले नाही. पोलीस येईपर्यंत ही महिला मंत्रालयातून पळूनही गेली. त्यावेळी फडणवीस दालनात नव्हते. ते सागर बंगल्यावर पक्षाची बैठक घेत होते. ही घटना आज दुपारी सर्वांना कळताच एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे काल सायंकाळी ही घटना घडल्यानंतर आज सायंकाळपर्यंत पोलिसांना महिलेचा पत्ता मिळाला नव्हता हे सर्व धक्कादायक आहे .
आज मरिन ड्राईव्ह पोलिसांनी या महिलेचा शोध सुरू केला. अखेर 18 तासांनी पोलिसांना या महिलेची ओळख पटवण्यात यश आले. मात्र, पोलिसांनी या महिलेचे नाव उघड करण्यास नकार दिला. त्यानंतर या महिलेचे नाव धनश्री सहस्त्रबुद्धे असे असल्याचे समजले. दुपारी 3.30 वाजता या महिलेला ताब्यात घेण्यासाठी महिला पोलीस दादर येथील एका सोसायटीत आल्या. ही महिला एकटीच राहते. महिला पोलिसांनी तिच्या घराचा दरवाजा वाजवला. मात्र या महिलेने दरवाजा उघडलाच नाही. त्यानंतर तेथे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ही महिला मनोरुग्ण असल्याचे उघड झाले. या महिलेने सोसायटीतील रहिवाशांवर अनेकदा हल्ला केला असून, दरवाजाची तोडफोड करण्याचा प्रयत्नही केला आहे. सोसायटीतील नागरिकांनी तिच्या विरूध्द पोलिसातही तक्रार केली आहे. सलमान खानचा फोन नंबर द्या, त्याच्याशी मला लग्न करायचे असल्याचे ही महिला सांगते. या महिलेविरोधात सोसायटीने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी केल्या आहेत. माझीही वैयक्तिक तक्रार आहे. माझ्यावर या महिलेने हल्ला केला होता. एके दिवशी ही महिला चाकू घेऊन इमारतीच्या खाली आली होती. हे रोजचे झाले आहे. या महिलेला तरी आत टाका नाहीतर आम्हाला पोलिसांनी आत टाकावे, असे सोसायटीतील लोकांनी सांगितले.
आज ही तोडफोडीची घटना दुपारी उजेडात येताच राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, मंत्रालयातील 6 व्या मजल्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दालन आहे. याच दालनाबाहेर एका महिलेने गृहमंत्र्यांच्या नावाची पाटी तोडून आपला राग व्यक्त केला. एकीकडे सरकारचे लाडक्या बहिणीचे इव्हेंट सुरू आहेत, तर दुसरीकडे एक महिला मंत्रालयात येऊन संतापाने नावाची पाटी फोडत आहे. राज्यातील ही दोन चित्र खूप काही सांगून जात आहेत.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की, ही महिला कोण आहे. कशासाठी आली, याची माहिती घेतली जाईल. विरोधकांनी या महिलेला पाठवले नाही ना, हे पाहायला हवे. शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी सांगितले की, आज फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. उद्या मुख्यमंत्री आणि दुसर्या उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाची तोडफोड होईल. त्यामुळे या घटनेची चौकशी करून महिलेला कडक शासन करणे गरजेचे आहे.
शिर्डी येथे लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कार्यालयात नासधूस झाल्याची घटना कालची आहे. त्या महिलेचे काय म्हणणे होते, तिने हे कशाकरिता केले, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. उद्विगणतेमधून तिने हे कृत्य केले का? किंवा तिची व्यथा काय आहे? हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. विरोधकांकडे कोणतेही मुद्दे शिल्लक नाहीत. त्यामुळे ते अशी टीका करत आहेत. एखादी बहीण चिडली असेल तर आम्ही पाहून घेऊ. कुणी जाणीवपूर्वक पाठविले असेल तर तेही पाहून घेऊ. आता माझे म्हणणे एवढेच आहे की, संबंधित महिलेची व्यथा समजून घेऊ. विरोधकांची सत्ता असताना मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात येऊन लोकांनी रॉकेल ओतून घेतलेले आहे. मंत्रालयात कुणाचीच अडवणूक केली जात नाही. काही लोक आपले प्रश्न मांडण्यासाठी वरच्या मजल्यावरून जाळीवर उडी घेतात. याचा अर्थ ते आमचे विरोधक नाहीत. त्यांच्या अडचणी समजून घेऊ. सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही मंत्रालयाचे दरवाजे सामान्यांसाठी बंद करू शकत नाही.