मनसे प्रति पालिका बैठक भरवणार! आदित्य ठाकरे, शेलारना आमंत्रण

मुंबई- राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी प्रतिकात्मक कॅबिनेट बैठक घेतली जाते त्या धर्तीवर मनसेने मुंबईत प्रतिकात्मक पालिका बैठक आयोजित केली आहे. अशी बैठक पहिल्यांदाच होणार आहे. या बैठकीला उबाठाचे आदित्य ठाकरे आणि भाजपा नेते आशिष शेलार यांना आमंत्रित केले आहे.
पालिकेची मुदत संपल्यानंतरही निवडणूक झाली नसल्याने महापालिकेत सध्या नगरसेवक नाहीत. त्यामुळे लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मनसेच्या वतीने 26 एप्रिलला सायंकाळी 5 वाजता पालिका कार्यालयासमोर पत्रकार भवनात या बैठकीचे नियोजन केले आहे. त्यासाठी मनसेने मुंबईतील सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुखांना पत्र पाठवून या सभागृहात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. महापालिकेसाठी पहिल्यांदाच या प्रकाराचे प्रतिसभागृह भरवले जाणार आहे.
या सभागृह बैठकीत मुंबईतील रस्ते, आरोग्य आणि आपत्कालीन व्यवस्थापन या विषयांवर चर्चा होणार
आहे.प्रति पालिका सभागृहात प्रति महापौरही असणार आहेत. या सभागृहात उपस्थित राहण्यासाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांना मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्याकडून आमंत्रण देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, समाजवादी पार्टीचे नेते सईसभाई शेख, काँग्रेस पक्षाच्या खासदार वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राखी जाधव यांच्यासह इतरही पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. या निमंत्रण पत्रात मनसेने म्हटले आहे की, मुंबई महानगरपालिका दोन चाकांवर चालते. एक प्रशासन आणि एक लोकप्रतिनिधी. पण गेल्या तीन वर्षांपासून यातील लोकप्रतिनिधी हे चाक बंद झाले आहे. मुंबईत अनेक समस्या आहेत, ज्यावर चर्चा व्हावी, मार्ग निघावा अशी जनभावना आहे. पण महापालिका सभागृह अस्तित्वात नसल्यामुळे चर्चा होत नाहीत. त्यामुळे ह्या सर्व प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्यासाठी आम्ही प्रतिसभागृहाची संकल्पना मांडत आहोत. ज्यामध्ये विविध राजकीय संघटना, राजकीय प्रतिनिधी यांनी सहभाग नोंदवावा, अशी अपेक्षा आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फुटावी. महानगरपालिका प्रशासनाला या प्रश्नांची जाणीव व्हावी व त्यावर मार्ग निघावा, यासाठी हे चर्चेचे व्यासपीठ आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून फक्त नागरिकांच्या समस्यांवर चर्चा व्हावी हा उद्देश आहे. मुंबईनंतर राज्यातील इतरही सर्व जिल्ह्यांमध्ये प्रतिपालिका सभागृह भरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.