प्राग- मध्य युरोपातील चेक रिपब्लिक ते पोलंड व रोमानिया मधील अनेक देशांमध्ये मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरस्थितीमुळे झालेल्या विविध घटनांमध्ये आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेघर झाले आहेत.
मध्य युरोपात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मोरवा नदीला मोठा पूर आला. त्याचा फटका प्राग शहराला बसला आहे. चेक व पोलंडच्या ईशान्येकडील भागात आलेल्या या पुरामुळे ओस्ट्राव्हा शहरातील दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. या ठिकाणी असलेली वीजनिर्मिती केंद्र व अनेक रासायनिक कारखाने बंद पडले आहेत. युरोपातील थंडीच्या काळात गरम पाण्याचा पुरवठा करणारे केंद्रही या पावसामुळे बंद पडले आहे. रोमानियामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला असून ऑस्ट्रियाच्या एका अग्निशमन दलाचा एक जवान मदतकार्य करताना मृत्युमुखी पडला आहे. पोलंडमधील अनेक शहरे पाण्याखाली गेली आहेत.डेन्युब नदीला आलेल्या पुरामुळे स्लोव्हाकियाची राजधानी ब्राटिस्लावा व हंगेरीची राजधानी बुडापेस्टमध्ये सगळीकडे पाणी साचले आहे.