लखनौ – उत्तर प्रदेशातील पोलिसांनी आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कडक आदेशानंतर मंदिर, मशिदीवरील भोंगे उतरवण्यास सुरुवात केली आणि या मोहिमेला विरोध करण्याची हिंमत एकानेही केली नाही.
गेल्या दोन दिवसांत लखनौ, पीलभीत अशा अनेक प्रमुख शहरांत धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्यात आले. काही भोंग्यांचा आवाज कमी करायला लावला आहे. महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेकदा मशिदींवरील भोंगे हटवण्याची मागणी केली आहे. परंतु महाराष्ट्रात अशी कारवाई करण्याची हिंमत अद्याप सरकारने दाखवली नाही. उत्तर प्रदेशात मात्र योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने भोंगे उतरवण्याची कठोर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईला मुस्लीम समाजाने तोंडी विरोध केला, पण कुठेही कारवाई थांबली नाही.
पिलभित, लखनौ, कन्नोज आणि गोरखपूर शहरात पोलिसांनी कारवाई केली. कायद्यानुसार मान्य पातळीपेक्षा अधिक आवाज ज्या भोंग्यांचा होता ते भोंगे धडाधड उतरवले जात आहेत. पिलभितमध्ये आज 133 भोंगे हटवले. अनेक ठिकाणी भोंग्याच्या ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा अधिक भोंगे लावण्यात आले होते. काही भोंग्यांचा आवाजही अधिक असल्याने लोकांना त्याचा त्रास होत होता. पोलिसांनी हे भोंगे काढून सरकारी शाळांवर लावण्यासाठी ते शिक्षण विभागाला दिले आहेत.
पोलिसांनी भोंगे लावणार्या धार्मिक स्थळांना इशारा दिला आहे की, भोंग्याचा वापर नियमानुसार करावा लागणार आहे. भोंग्याचा आवाज त्यांच्या परिसरापुरताच राहायला हवा. भोंग्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या.
सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणाबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार रहिवासी क्षेत्रात दिवसा 55 आणि रात्री 45 डेसिबलची मर्यादा आहे. परंतु धार्मिक स्थळे या मर्यादेचे उल्लंघन करतात. हेच कारण देत उत्तर प्रदेश पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई सर्व धर्मांच्या धार्मिक स्थळांवर केली जात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र मुस्लीम नेत्यांनी कारवाईला विरोध केला आहे. उत्तर प्रदेशातील विरोधी पक्षांनीही सरकारवर या कारवाईवरून टीका केली आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, पोलीस मुस्लिमांच्या प्रार्थनास्थळांवरच कारवाई करत आहेत. अनेक मशिदींमध्ये पोलीस पादत्राणे घालून घुसले आणि त्यांनी पावित्र्याचा भंग केला. या कारवाईमुळे सामाजिक सलोखाही बिघडत आहे. समाजवादी पक्षाचे प्रवक्ते तारीख खान म्हणाले आहे की, ध्वनिप्रदूषण होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले असे म्हणत भोंग्यावर कारवाई करीत असतील तर फटाके वाजवण्याच्या बाबतीतही अशाच सूचना दिल्या होत्या. तेव्हा उत्तर परदेशातील भाजपा सरकारने सणाच्या वेळी फटाके वाजवण्याला मनाई नको असे म्हटले. फटाक्यांमुळे
ध्वनीप्रदूषण झाले नाही का? त्यावेळी सुप्रीम कोर्टाचे आदेश मानायचे नसतात का?
भाजपाने यावर उत्तर दिले की, ध्वनिप्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. अनधिकृत आणि मर्यादेपेक्षा जास्त आवाजात भोंगे वाजवणार्यांवरच कारवाई केली जात आहे. यात हिंदू- मुस्लीम भेद करण्याची गरज नाही. हिंदूच्या मंदिरावरही कारवाई केली जात आहे. या कारवाईला धर्माच्या दृष्टीकोनातून पाहू नये.