नागपूर – आज महाराष्ट्राच्या 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्री असा 39 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. यात 19 नवे चेहरे आहेत. तिन्ही पक्षातील काही दिग्गज नेत्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवून त्यांना एकप्रकारे धक्काच दिला. छगन भुजबळ आणि सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद दिलेले नाही याचे पडसाद उमटणार आहेत. ते आज सोहळ्याला उपस्थित नव्हते. भाजपाच्या 19 शिंदे गटाच्या 11 आणि अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी आज शपथ घेतली. दरम्यान शपथविधी सोहळ्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूरात धक्कादायक माहिती जाहीर केली. अजित पवार म्हणाले की यावेळी आम्ही तीनही पक्षांनी निर्णय घेतला आहे की काहींची मंत्रिपदे ही अडीच-अडीच वर्षांसाठी असतील. यामुळे विविध प्रदेश, जिल्हा यांना प्रतिनिधित्व मिळेल. महाराष्ट्रात अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्यावरून प्रचंड राजकारण झाले. त्यानंतर आता अडीच-अडीच वर्षे मंत्रिपद वाटून देण्याचा अजब प्रकार होणार आहे. यामुळे आधीच्या व नंतरच्या अशा दोघाही मंत्र्यांना त्यांच्या खात्याचे काम नीट करता येणार नाही.
आज शपथविधी झाला असला तरी अजून खातेवाटप झालेले नाही. शिंदे गटाला गृह खाते मिळाले का ते उघड झाले नाही. यामुळे शिंदे गटाची नाराजी कायम आहे का याचे उत्तर मिळाले नाही.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अजित पवार गटाचा मेळावा नागपुरात पार पडला. या मेळाव्यातील भाषणात अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली. त्यांनी निवडणुकांमधील विजय आणि इतरही बाबींवर भाष्य केले. आमदारांना दिलेल्या मंत्रिपदाचा कालावधी अडीच वर्षाचा असेल असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अजित पवार म्हणाले की, राज्यात फेब्रुवारी 2022 मध्ये जिल्हा परिषद निवडणुका होणे गरजेचे होते. मात्र, 3 वर्षे निवडणुका झाल्या नाहीत, आता अनेक निवडणुका होणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर सुनील तटकरे, चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांचा प्रतिनिधी असे एकत्र बसणार आहे. त्यानंतर 3 महिन्यातच महामंडळ अध्यक्ष व पदाधिकारी यांची निवड केली जाणार आहे. सगळ्यांनाच वाटते की आपल्याला मंत्रिमंडळामध्ये संधी मिळावी. जागा मर्यादित असतात, सगळेच ताकदीचे असतात. पण गेल्यावेळी आपण सरकारमध्ये गेलो त्यावेळी काहींना दीड वर्षाचीच मंत्रिपदाची कारकिर्द मिळाली. त्यामुळे या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आम्ही लोकांनी ठरवले आहे की, काहींना अडीच-अडीच वर्षांसाठी संधी देण्यात येणार आहे. म्हणजे अनेक मंत्री आणि राज्यमंत्री त्यामध्ये सामावून घेतले जातील. अनेक जिल्ह्यांना प्रतिनिधित्व मिळेल. तिघांमध्येही याबाबत एकवाक्यता झालेली आहे .
ते पुढे म्हणाले की, लोकसभेला मी तटकरे साहेबांना म्हणायचो, तटकरे साहेब तुम्ही तरी तुमची लोकसभेची जागा काढा. जर यश मिळाले नसते तर भोपळा मिळाला असता. तटकरे साहेब मला नाही म्हणू शकत नव्हते, त्यांनी विजय खेचून आणला, आम्ही मात्र त्यानंतर खूप बदल केले.
मी माझा स्वभाव बदलला. जबाबदारी आली की माणूस बदलतो. मी ठरवले आता कुणावर चिडायचे नाही. मी स्वभाव बदलला त्याचा परिणाम दिसला. अजित पवारांनी तंबी देत म्हटले की आपल्याकडून गैरसमज होतील अशी वक्तव्ये
करू नये.