भोपाळ – मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे दिग्गज नेते आरीफ अकील यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. भाेपाळ उत्तर विधानसभा मतदार संघातून ते ६ वेळा निवडून आले होते.
आरीफ अकील काँग्रेसच्या सरकारमध्ये दोन वेळा मंत्रीपद भुषविले होते. सन १९९० मध्ये ते पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकले. भोपाळ वायू गळती दुर्घटनेतील बाधितांसाठी अकील यांनी आरीफ नगर नावाची स्वतंत्र वस्ती निर्माण केली. तसेच बाधितांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले होते.
सन २०२३ मध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे अकील यांनी भोपाळ उत्तर मतदारसंघातून आपले पुत्र आतिफ अकील यांना उमेदवारी दिली. सध्या आतिफ हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
आरीफ अकील यांच्या निधनावर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला.
