धाराशिव – जिल्ह्यातील भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथे आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास एका बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केला.यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. जखमी शेतकऱ्याचे नाव विजय माने असे आहे.
विजय माने हे शेतात रात्री पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. त्याचवेळी आधीच दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.त्याने आरडाओरड केल्याने शेजारील शेतात असलेले सागर माने धावत आले. त्यांनी बॅटरीचा प्रकाशझोत टाकल्याने बिबट्या तिथून पळाला.त्यामुळे विजय माने यांचा जीव वाचला.या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना सुरुवातीला भूम येथील दवाखान्यात दाखल केले होते.मात्र त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बार्थी येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. मागील दहा- पंधरा दिवसापासून भूम तालुक्यासह शहराजवळ बिबट्या वावरत असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे. नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात आले आहे.