जळगाव- मध्य रेल्वेच्या भुसावळ जंक्शन येथे मालगाडीचे २ डब्बे आज सकाळी घसरल्याची घटना घडली. यात मनुष्यहानी झालेली नाही. परंतु रेल्वेच्या रुळांचे आणि मालगाडीचे मोठे नुकसान झाले. या वर्षातील ही पाचवी घटना आहे.
मुख्य यार्डामधून मेन लाईनवरून यार्डामध्ये प्रवेश करताना मालगाडीच्या ५८ डब्यांपैकी दोन डब्यांचे चाके आज सकाळच्या सुमारास रेल्वे रुळावरून घसरली. ही घटना नवीन गुड्स शेडजवळ घडली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेची एटीआर गाडी घटनास्थळावर दाखल झाली होती आणि बचाव दलाने कार्याला सुरवात केली होती. संबंधित विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मेन लाईन मोकळी केली. मालगाडीचे दोन्ही डबे रेल्वे पुन्हा रुळावर चढविण्यात आले. त्या दोन डब्यांना जोडून पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असतानाच पुन्हा मालगाडीचा एक डबा रेल्वे रुळावरून घसरला. त्यानंतर हे दोन डबे पुन्हा मालगाडीच्या इतर ५८ डब्यांना जोडण्यात आले. या अपघाताच्या कारणाचा सविस्तर अहवाल रेल्वे बोर्डाला सादर करण्यात येणार आहे. ही घटना यार्डात घडल्याने मुंबई, नागपूर आणि नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर कोणताही परिणाम झाला नाही. २८ मे रोजी पश्चिम रेल्वेच्या हद्दीत पालघर यार्डात मालगाडीचे सहा डबे रुळांवरुन घसरल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक अनेक तासांसाठी विस्कळीत झाली होती.