भारतीय शेअर बाजारात अचानक मोठी पडझड होण्याचे कारण काय? जाणून घ्या

Why Market is Down Today: भारतीय शेअर बाजारात (Share Market) मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार तेजीसह उघडला. मात्र, नंतर यात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. बाजार बंद झाला त्यावेळी बीएसई इंडेक्स सेन्सेक्स तब्बल 1258 अंकांनी घसरून 77964 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टी-50 मध्ये तब्बल 388 अंकांची घसरण झाल्याचे दिसून आले. निफ्टी बाजार बंद झाला त्यावेळी 23,616 अंकांवर होता.

सेन्सेक्स आणि निफ्टी (Share Market Crash) दोन्हीमध्ये दिवसाखेर दीड टक्क्यांहून अधिक घसरण झाली. यामुळे गुंतवणुकदारांचे 11 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकचे नुकसान झाले. शेअर मार्केटमध्ये (Why Market is Down Today) एवढी मोठी पडझड होण्यामागची कारणे नक्की काय आहेत, त्याविषयी जाणून घेऊया.

ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस

चीनपाठोपाठ आता भारतातही या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळले आहे. एचएमपीव्हीची लागण झालेले रुग्ण आढळल्याची माहिती समोर आल्यानंतर शेअर बाजारात (Share Market)  मोठ्या प्रमाणात घसरणीला सुरुवात झाली. बाजारात आधीच नकारात्मक वातावरण असताना, या बातमीचाही मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. कोरोनासारखी स्थिती निर्माण होण्याची भिती अजुनही गुंतवणुकदारांमध्ये आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता

जागतिक बाजारात मंदी व महागाईचे सावट आहे. याशिवाय, लवकरच डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. ते परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने, प्रामुख्यानेची चीनशी असलेल्या व्यापार युद्धाबाबत नक्की काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. आशियाई बाजारातही घसरण पाहायला मिळाली. त्याचाच परिणाम भारतीय बाजारावर (Share Market) दिसून आला.

तिसऱ्या तिमाहीचा निकाल

कंपन्यांकडून लवकरच तिसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. या तिमाहीमध्ये कंपन्यांनी कशी कामगिरी केली, याकडे गुंतवणुकदारांचे लक्ष आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना खबरदारी बाळगली जात आहे.

डॉलर आणि कच्चे तेल

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सुरूच आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत सध्या 85.67 रुपये आहे. याशिवाय, परकीय गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात भारतीय बाजारातून पैसा काढून घेत आहेत. कच्चा तेलाच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. या सर्वांचा नकारात्मक परिणाम भारतीय बाजारावर दिसून येत आहे.