डेहराडून
भारतीय रेल्वेने उत्तराखंडमधील चीन सीमेपर्यंत रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. हा नवा रेल्वेमार्ग चंपावत जिल्ह्यातील टनकपूर ते बागेश्वर दरम्यान बांधला जाणार आहे. या १६९ किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग हिमालयाच्या उंच पर्वतरांगांमधून जाणार असून चीनच्या सीमेवर पिथौरागढ आणि बागेश्वरपर्यंत पोहोचणार आहे.
रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र सिंह यांनी ही माहिती देताना सांगितले की, नवीन रेल्वे मार्ग सैनिक हालचालींच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे कारण पिथौरागढ जिल्हा नेपाळ आणि चीनच्या आंतरराष्ट्रीय सीमेला जोडलेला आहे. टनकपूर हे भारत-नेपाळ सीमेवरील उत्तराखंडमधले नेपाळ सीमेवरील भारतातील शेवटचे रेल्वे स्टेशनदेखील आहे. या मार्गावर सर्वेक्षणासह खांब बसविण्याचे काम सुरू झाले आहे. या रेल्वेमार्गामुळे टनकपूरहून पिथौरागढमार्गे चीनच्या सीमेपर्यंत दोन ते तीन तासांत जाता येईल. नोइडाच्या स्कायलार्क इंजिनिअरिंग डिझायनिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या टीमने हे सर्वेक्षण केले आहे. यापूर्वी इंग्रजांनी १८८२ मध्ये टनकपूर-बागेश्वर रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण केले होते.