नवी दिल्ली- जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा कडक शब्दांत इशारा दिला. मन की बातच्या 121व्या भागात पंतप्रधान म्हणाले की, या हल्ल्यातील दहशतवाद्यांचे फोटो पाहून प्रत्येक भारतीयाचे रक्त खवळले आहे. हल्ल्यातील दोषींना सर्वात कठोर उत्तर दिले जाईल. मृत पर्यटकांच्या नातेवाईकांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही.
मोदी म्हणाले की, आज मी तुमच्याशी मन की बातमध्ये बोलत असताना माझ्या मनाला खूप वेदना होत आहेत. पहलगाम हल्ल्याने देशवासीयांना दुखावले आहे. या हल्ल्याने देशवासीयांच्या मनात खोल वेदना केल्या आहेत. या हल्ल्यात ज्यांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले आहे, त्यांचे दुःख मी समजू शकतो. दहशतवाद्यांचे फोटो पाहून प्रत्येक भारतीयाचे रक्त खवळले आहे. पहलगाममध्ये झालेला हा हल्ला दहशतवाद्यांच्या नैराश्याचा आणि भ्याडपणाचा प्रतीक आहे. जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होत होती, शाळा, महाविद्यालयांमध्ये चैतन्य येत होते, विकासकामांना गती मिळत होती, लोकशाही बळकट होत होती आणि पर्यटन क्षेत्रात विक्रमी वाढ होत होती, तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होत होत्या. काश्मीर पूर्वपदावर येत होते. हेच देशांच्या शत्रूंना आवडले नाही.
दहशतवाद्यांना आणि त्यांच्या आकांना काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त करायचे आहे. म्हणूनच त्यांनी एवढा मोठा
कट रचला. मोदी पुढे म्हणाले की, देशासमोरील या आव्हानाला तोंड देण्यासाठी आपल्याला आपला संकल्प दृढ करायचा आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत संपूर्ण जग आपल्या 140 कोटी भारतीयांसोबत उभे आहे. संकटात जगाचा मित्र म्हणून भारताच्या मानवतावादाच्या प्रति बांधिलकीतून हे होत आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून सहानुभूतीचे संदेश येत आहेत. मला जगभरातील नेत्यांनी फोन केले, पत्रे लिहिली, संदेश पाठवले. या अमानवी हल्ल्याचा सर्वांनी कठोर शब्दांत निषेध केला आहे आणि मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत संपूर्ण जग भारतासोबत उभे आहे. मी पीडित कुटुंबांना आश्वासन देतो की, त्यांना न्याय मिळेलच. या हल्ल्यातील दोषींना सर्वात कठोर उत्तर
दिले जाईल.
