भारतानंतर अमेरिकेतही ‘टिकटॉक’येणार बंदी ?

न्यूयॉर्क- भारतानंतर आता अमेरिकेतही ‘टिकटॉक’ वर बंदी येण्याची शक्यता आहे. कारण बंदूक नियंत्रण, गर्भपात आणि धर्म यासारख्या सामाजिक मुद्द्यांवर आधारित वापरकर्त्यांची माहिती गोळा करण्याचा आरोप अमेरिकेच्या न्याय विभागाने ‘टिकटॉक’वर केला आहे.

टिकटॉकसंबंधीची लेखी माहिती सरकारी वकिलांनी मध्यवर्ती अपिलीय न्यायालयाकडे पाठवली आहे. टिकटॉक आणि चीनमधील तिची पालक कंपनी ‘बाइटडान्स’ने अमेरिकन वापरकर्त्यांबद्दलची संवेदनशील माहिती चीनमधील सर्व्हरवर हस्तांतरित केली.यासाठी त्यांनी लार्क नावाच्या अंतर्गत प्रणालीचा वापर केला.टिकटॉकच्या कर्मचाऱ्यांना बाइटडान्सच्या अभियंत्यांशी थेट संपर्क साधण्यासाठी या प्रणालीचा वापर होतो.या प्रणालीद्वारे ‘टिकटॉक’च्या कर्मचाऱ्यांनी मिळविलेली अमेरिकेच्या वापरकर्त्यांची संवेदनशील माहिती चीनमधील ‘बाइटडान्स’च्या कर्मचाऱ्यांना सहज उपलब्ध होत असल्याचे वकिलांनी म्हटले आहे.माहितीमधील फेरफार आणि चीनच्या प्रभावाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.बाइटडान्स कंपनीशी संबंध तोडले नाही, तर अमेरिकेच्या कायद्यानुसार ‘टिकटॉक’वर काही महिन्यांची बंदी लागू केली जाऊ शकते.अध्यक्ष जो बायडेन यांनी हा कायदा यावर्षी एप्रिलमध्ये लागू केला होता. माहितीचे हस्तांतर ‘टिकटॉक’ने सामग्री दडपण्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी खटला चालू असून त्याची सुनावणी सप्टेंबरमध्ये होणार आहे.