मुंबई – उद्या महाराष्ट्र विधानसभेचे मतदान होणार आहे. त्याआधी आज सकाळीच विरारमध्ये अत्यंत धक्कादायक असा पैसे वाटपाचा प्रकार घडला. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनाच नालासोपाराच्या विवांता हॉटेलमध्ये पैशाच्या बॅगेसह पकडण्यात आले. त्यांच्या बॅगेत रोकड तर सापडलीच. पण अनेक डायर्या सापडल्या. या डायर्यांमध्ये अनेकांची नावे लिहिली होती. या सर्वांना मिळून 15 कोटी रुपये वाटल्याच्या नोंदी होत्या. याबरोबर पाचशेच्या नोटा भरलेली पाकिटेही सापडली. हॉटेलच्या रुममध्ये 19 लाखांची रोकडही आढळली. या सर्व प्रकाराने महाराष्ट्रात प्रचंड खळबळ माजली आहे. भाजपाचा केंद्रातील ज्येष्ठ नेता अशा तर्हेने पकडला जातो यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना मविआच्या नेत्यांनी भाजपावर कडाडून टीका केली. राहुल गांधी यांनीही याबाबत ट्वीट केले. तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष बावनकुळे यांनी तावडे यांना वाचविण्यासाठी हास्यास्पद प्रतिक्रिया देत बविआनेच हे षड्यंत्र रचले असा आरोप केला. विवांता हॉटेलमधील घटनेनंतर विनोद तावडे आणि नालासोपारा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार राजन नाईक यांच्यावर निवडणूक आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
नालासोपाराच्या विवांता हॉटेलमध्ये आज सकाळीच बहुजन विकास आघाडी (बविआ)चे कार्यकर्ते घुसले. त्यांनी हॉटेलमध्ये असलेले भाजपाचे केंद्रातील महासचिव विनोद तावडे यांना घेराव घातला. त्यांची बॅग हिसकावून घेतली. बॅगेतील रोकड सर्वांना दाखवली. बॅगेत असलेल्या डायर्या जप्त केल्या. पैसे भरलेली पाकिटे फाडून त्यात असलेल्या नोटा कॅमेर्यासमोर झळकवल्या. विनोद तावडे यांना घेरून बविआचा कार्यकर्ता संतप्त होऊन त्यांना सवाल करत होता की, तुम्ही आमच्या मतदारसंघात नेमके कशासाठी आला आहात? महाराष्ट्राची ही नीती आहे का? हा सत्तेचा गैरवापर सुरू आहे. कुठे नेऊन ठेवला आहे हा महाराष्ट्र? तावडे यांना चहूबाजूंनी बविआच्या कार्यकर्त्यांनी घेरले होते. याच वेळेस तेथे आलेल्या महिला हॉटेलच्या पायर्यांवर बसलेल्या दिसल्या. त्यांचेही व्हिडिओ या कार्यकर्त्यांनी काढले आणि विनोद तावडे हे पैशाचे वाटप करीत असल्याचा आरोप करत राडा घातला.
यानंतर बविआचे उमेेदवार क्षितीज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर हेही तेथे पोहोचले. पोलीसही धावले. निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांना फोन करण्यात आला. याच हॉटेलात वरच्या रूममध्ये भाजपाचे नालासोपाराचे उमेदवार राजन नाईक हे एका खोलीत बसले होते. क्षितीज ठाकूर यांनी त्यांनाही खाली बोलावून या सर्व प्रकाराबाबत खुलासा करण्यास सांगितला. मात्र राजन नाईक खाली आले नाहीत. तेव्हा राजन नाईक महिलांच्या गराड्यात लपून बसले आहेत, असे क्षितीज ठाकूर कार्यकर्त्यांना म्हणाले. जवळजवळ तीन तास हा महागोंधळ सुरू होता. यानंतर हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर आणि विनोद तावडे हे पत्रकारांशी एकत्रपणे बोलतील असे ठरले. कार्यकर्त्यांना बाहेर जाण्यास सांगून पोलीस आणि पत्रकारांच्या समोर तिघांची पत्रकार परिषद सुरू झाली. यावेळी राजन नाईकही पत्रकार परिषदेत आले आणि त्यांनी सांगितले की, उद्याच्या दिवशी मतदानाच्या नियमांबद्दल माहिती देण्यासाठी विनोद तावडे यांनी हॉटेलात बैठक बोलावली होती. मात्र हे सांगताना इतकी रोकड हॉटेलात आणि बॅगेत का आहे याचा खुलासा ते करू शकले नाहीत. विनोद तावडे आल्यापासून हॉटेलचे सीसीटीव्ही बंद का होते, याचाही खुलासा कुणी करू शकले नाहीत. हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत भाजपावर पैसे वाटल्याचा आरोप केला. यानंतर विनोद तावडे म्हणाले की, जे झाले आहे त्याचे सीसीटीव्ही फुटेज असेल. त्याचा पोलिसांनी आणि आयोगाने तपासा करावा आणि खरे काय ते जाणून घ्यावे. यावर पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार सुरू केला. मात्र तितक्यात निवडणूक आयोगाकडून हितेंद्र ठाकूर यांना तातडीचा फोन आला आणि निवडणूक आचारसंहिता सुरू असताना उमेदवार पत्रकार परिषद घेऊ शकत नाही, असे आयोगाने सांगितले. हे कळताच पोलिसांनी पत्रकार परिषद रोखली आणि कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यापासून तावडे यांची सुटका झाली.
या सर्व गदारोळानंतर तावडे यांना हॉटेलबाहेर आणण्यात आले. ते गाडीने निघणार तेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्यांची गाडी पंक्चर करण्यात आली आहे. त्यामुळे ते हितेंद्र ठाकूर यांच्या गाडीतूनच घटनास्थळावरून निघून गेले. यानंतर पत्रकारांशी बोलताना हितेंद्र ठाकूर यांनी गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, विनोद तावडे हे पाच कोटी रुपये घेऊन येणार आहेत याची टीप मला कालच मुंबईतील भाजपा नेत्यानेच दिली होती. त्यांच्या या वाक्याने अधिकच खळबळ माजली. मुंबईतील हा भाजपा नेता कोण असे विचारल्यावर त्यांनी विनोद तावडे यांचे कोण मित्र आहेत ते सर्वांना माहीत आहे, असे म्हटले. हितेंद्र ठाकूर यांनी असेही सांगितले की, विनोद तावडे यांना बविआच्या कार्यकर्त्यांनी बॅगेसह घेरल्यानंतर त्यांनी मला 50 फोन केले. मी तुमचा मित्र आहे हे प्रकरण मिटवा, अशी त्यांनी सातत्याने विनंती केली. दरम्यान, बविआ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांनी आणि पोलिसांनी हॉटेलात प्रत्येक खोलीची तपासणी केली. हॉटेलच्या 406 क्रमांकाच्या रुममध्ये 9 लाख रुपयांची रोकड सापडली. इतर ठिकाणी मिळून हॉटेलमध्ये एकूण 19 लाख रुपयांची रोकड सापडली. हितेंद्र ठाकूर यावर म्हणाले की, विनोद तावडे यांनी 5 कोटी आणले होते. बाकीचे सर्व पैसे वाटून झाले असतील. या घटनेवर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विनोद तावडेंनी पैसे वाटले नाहीत. त्यांच्याकडे पैसे सापडले नाहीत. पराभव दिसू लागल्याने विरोधक असा आरोप करत आहेत. मविआची ही इको सिस्टीम आहे. तावडे यात दोषी नाहीत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले की, मोदीजी हे 5 कोटी रुपये कोणत्या तिजोरीमधून आणले? जनतेचा पैसा लुटून तुम्हाला कुणी टेम्पोत पाठवले. या एकूण घटनेमुळे राजकारणात खळबळ माजली आहे. भाजपाला याचा नक्कीच धक्का बसेल. भाजपामधील अंतर्गत वादातून विनोद तावडे हे पकडले गेले असले तरी मुळात भाजपाकडून पैसे वाटप केले जात होते हे आज अगदी स्पष्ट उघड झाले. भाजपाच्या राजकारणातील याचे प्रदीर्घ पडसाद उमटतील याबाबत शंका नाही.
तावडेंना भाजपानेच अडकवले
विनोद तावडे यांच्या या पैसे वाटपावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपावर हल्ला चढवला. तावडे यांना या प्रकरणात अडकवण्याचे कारस्थान भाजपाच्याच एका बड्या नेत्याने रचले. तावडे राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहेत. मोदी शहांचे जवळचे आहेत. त्यामुळे बहुजन समाजातील हे व्यक्तिमत्व महाराष्ट्रात आणखी मोठे होऊ द्यायचे नाही. या विचारातून तावडेंना राजकारणातून उठविण्यासाठी पैसे वाटपाची माहिती नेमकी हितेंद्र ठाकूर यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. पुढच्या निवडणुकीत तावडेंचे अस्थित्वच राहू नये यासाठी हा डाव टाकण्यात आला.
सीसीटीव्ही तपासा! आयोगाकडून चौकशी करा
विनोद तावडे यांनी पैसे वाटपाच्या वादाबद्दल नंतर असे निवेदन जारी केले की, वाडा येथून आज मी मुंबईला परतत असताना वसई परिसरात आल्यावर स्थानिक भाजपा उमेदवार राजन नाईक यांना चौकशीसाठी फोन केला. आम्ही सर्व कार्यकर्ते वसई येथे एका हॉटेलमध्ये आहोत. आपण चहाला या, असे त्यांनी सांगितले. मी तेथे पोहोचल्यावर स्वाभाविकपणे निवडणुकीची चर्चा झाली. मतदानाच्या दिवशीची तांत्रिक प्रक्रिया व आपण घ्यायची काळजी याविषयी मी बोलत होतो. त्यावेळी अचानक काही कार्यकर्ते आले. त्यांनी माझ्याभोवती कोंडाळे करून आरडाओरडा सुरू केला. हे कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे असल्याचे समजल्यानंतर मी त्या पक्षाचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांना फोन केला व आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवरावे, अशी विनंती केली. हितेंद्र ठाकूर व आ. क्षितीज ठाकूर तेथे आले. त्या दोघांशी बोलणे झाल्यावर त्यांच्यासोबत मी एकाच गाडीतून बाहेर पडलो. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये टिपला गेला आहे. त्यावेळी माझ्याकडून पैसे वाटप होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या संदर्भातील सीसीटीव्ही चित्रण तपासावे म्हणजे दूध का दूध, पानी का पानी होईल. राहुल गांधी व सुप्रिया सुळे अशा यासंदर्भात टीका करणार्या नेत्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी. तसेच याबाबतीत निवडणूक आयोगाकडून
निःपक्ष चौकशी व्हावी. माझी प्रतिमा मलिन व्हायचे कारण नाही. कारण पैशाचा विषय माझा नाही. पैशांसंदर्भातल्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. भाजपाच्या लोकांनी टीप दिली, हे हितेंद्र ठाकूर धादांत खोटे बोलत आहेत.