मुंबई- ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री भाजपाचे जयकुमार गोरे यांची महिलेकडून झालेल्या बदनामी प्रकरणात शरद पवार गटाच्या नेत्यांचा हात आहे, असे गंभीर वक्तव्य आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. राजकारणात विरोध असू शकतो, पण एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचे कारस्थान करणे हे योग्य नव्हे असेही फडणवीस म्हणाले. या प्रकरणात खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे पत्रकार तुषार खरात यांच्या संपर्कात होते, असेही वक्तव्य आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जयकुमार गोरे एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आले होते. आरोप करणाऱ्या महिलेला गोरे यांच्या माणसाकडून 1 कोटीची रोकड खंडणी म्हणून घेताना काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाची देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सविस्तर माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने प्रकरण मिटवण्यासाठी गोरेंकडे 3 कोटी रुपयांची मागणी केली. याबाबतीत जयकुमार गोरे यांच्या धाडसाचे मी कौतुक करतो. एखाद्याने बदनामी नको म्हणून खंडणी देऊन टाकली असती, पण गोरे यांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर खंडणी मागण्यासंबंधीच्या फोनवरील संवादाच्या टेप त्यांनी पोलिसांकडे सादर केल्या. पोलिसांनी मग सापळा रचला आणि महिलेला 1 कोटी रुपयांची खंडणी घेताना रंगेहाथ अटक केली. जयकुमार गोरे बदनामी प्रकरणात चार गुन्हे दाखल झाले आहेत. संबंधित महिला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील असल्याचा उपप्रचार करण्यात आला, अशी तक्रार उन्मेष मोहिते यांनी केली होती. विराज शिंदे यांनी खरात विरुद्ध तक्रार केली होती. युट्युबर पत्रकार तुषार खरात, एक महिला, अनिल सुभेदार या सर्वांना मिळून गोरे यांना बदनाम करण्याचा कट रचला. या प्रकरणात शरद पवार यांच्या पक्षाचा मोठा हात आहे. त्यांच्या पक्षाचे माण तालुक्यातील नेते प्रभाकर देखमुख यांनी तिन्ही आरोपींशी 150 वेळा संपर्क केला आहे. देशमुख यांच्याकडे व्हिडिओही पाठवण्यात आले. या सर्वांनी हा कट रचल्याचा पुरावा आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी आरोपी तुषार खरात यांच्याशी संपर्क केला होता. गोरेंच्या विरोधात जे व्हिडिओ तयार केले गेले ते सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना पाठवले होते. याची चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणात कट रचल्याचा आरोप ज्या प्रभाकर देशमुख यांच्यावर झाला ते माजी आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी माण तालुक्यात समाजकार्य सुरू केले होते. अमिर खानच्या पाणी फाऊंडेशनचेही काम त्यांनी काही काळ केले. नंतर 2017 साली ते राजकारणात सक्रिय झाले. त्यांना शरद पवार यांच्याकडून आमदारकीचे तिकीट अपेक्षित होते, पण त्यांना ते दिले गेले नाही. जयकुमार गोरे यांच्याच मतदारसंघात ते कार्यरत होते.
फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझे नाव घेतले आहे. मी तपासासाठी तयार आहे. मी माझा फोन तपासासाठी देण्याससुद्धा तयार आहे.
आमदार आमदार रोहित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझे आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव घेतले. आमच्याकडे त्या महिलेचा विषय आला होता.त्या पत्रकाराला न्याय मिळावा म्हणून माहिती घेण्यासाठी 1 ते 2 वेळा फोन केला. आम्ही 100 वेळा फोन केलेला नाही. या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे. जनतेसमोर सत्य आले पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे.
