सातारा- माण तालुक्याच्या सीमेवर असलेल्या ब्रिटिशकालीन राजेवाडी तलावावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. १४८ वर्षापूर्वी इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांनी मातीने बांधलेल्या या तलावाचे नैसर्गिक सौंदर्य मनाला मोहित करणारे आहे. सांडव्यावरून वाहणारे पाणी पर्यटकांना आकर्षित करत आहे.
ब्रिटिश राणी व्हिक्टोरिया यांनी त्या काळातील जनतेला रोजगार उपलब्ध व्हावा.तसेच भविष्यात दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी उपाययोजना म्हणून माणगंगा नदीवर राजेवाडी तलावाची निर्मिती केली. राणी व्हिक्टोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली सन १८७६ मध्ये उभारणी सुरुवात केलेल्या राजेवाडी मध्यम प्रकल्पाचे बांधकाम १८८५ मध्ये पूर्ण झाल्याची नोंद आहे.सांडव्यावरुन वाहणारे पाणी पर्यटकांसाठी पर्वणीच ठरते.जिल्ह्याच्या कानाकोपर्यातूनच नव्हे तर अन्य जिल्ह्यातूनही येणार्या पर्यटकांची गर्दी वाढत आहे. तलाव परिसरातील सौंदर्य आणि वाहणारे पाणी मनाला आल्हाद देते.हा तलाव जलसाठा आणि क्षेत्रफळाने सर्वात मोठा तलाव म्हणून ओळखला जातो. तलावाची सिंचन क्षमताही मोठी आहे. अशा परिस्थितीत या परिसराला पर्यटन स्थळाचा दर्जा देवून सुविधा उपलब्ध केल्यास पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकते
ब्रिटिशकाळातील राजेवाडी तलावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.