मैसुर – बोधगया येथील अडीच हजार वर्षे पुरातन बौद्ध मंदिराच्या व्यवस्थापन समितीत चार हिंदू धर्मीय सदस्यांच्या नियुक्तीला आक्षेप घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात देशभरातील बौद्ध धर्माचे अनुयायी उद्या देशव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती मैसुरचे माजी महापौर पुरुषोत्तम यांनी काल दिली.
मैसुरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, उद्या शहरातील बौद्ध धर्मीय मैसुरच्या सिद्धार्थनगर येथील बुद्धाच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करुन नव्या उपायुक्तांच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार आहेत. या आंदोलनानंतर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सर्व राज्य सरकारना देण्यासाठी एक निवेदन उपायुक्तांना देण्यात येईल. संविधान दिनाच्या दिवशी बौद्धधर्मीयांच्या हक्कांच्या रक्षणाची मागणीही यावेळी करण्यात येणार आहे. बोधगया येथील बुद्धाच्या मुर्तीसमोर शिवाची मूर्ती स्थापन करणे निषेधार्ह असून येथे होणाऱ्या होमहवन व पूजेमुळे बुद्ध धर्मियांच्या भावना दुखावल्या जात आहेत. बोधगया येथील मंदिर व्यवस्थापनामध्ये चार हिंदू धर्मियांची नियुक्ती करणेही चुकीचे असून सरकारने बोधगयाच्या मंदिर व्यवस्थापनात केवळ बौद्ध धर्मीय व्यक्तींचीच नियुक्ती करावी अशी मागणी आहे .