बुलढाण्यात गावकऱ्यांना अचानक टक्कल पडण्याचे कारण काय? वाचा

Buldhana Hair Loss : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात असणाऱ्या बोंडगाव, कालवड आणि कठोरा या गावांमध्ये अचानक काहीजणांना टक्कल पडल्याची घटना समोर आली आहे. जवळपास 40 ते 50 जणांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. अवघ्या काही दिवसातच अनेकांना टक्कल पडल्याने गावकरी घाबरले आहेत. अचानक डोक्यात खाज सुटणे, केस गळणे व त्यानंतर तीनच दिवसात टक्कल पडत आहे. याबाबतची माहिती समोर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने याची दखल घेतल गावात आरोग्य सर्वेक्षण सुरू केले.

जवळपास 40 ते 50 जणांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. गावातील महिला, पुरुष, लहान मुलामुलींचे केस गळत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

अचानक टक्कल पडण्यामागचे कारण का?

गावातील 40-50 जणांचे अचानक केस गळू लागल्याने नागरिकांमध्ये भिती पसरली. यावर उपचारासाठी सुरुवातीला काही जणांनी खासगी डॉक्टरकडे देखील धाव घेतली. प्रथमदर्शनी अचानक टक्कल पडण्यामागचे कारण शॅम्पू असावा, असे वाटले. परंतु, असे अनेकजण होते ज्यांनी कधीच शॅम्पूचा वापर केला नव्हता. फंगल इन्फेक्शन असू शकते असेही प्रथम वाटले.

यामागचे कारण जाणून घेण्यासाठी स्थानिक आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले. तसेच, पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. गावकरी जे पाणी वापरत आहेत, त्यातील नायट्रेट सारख्या विषारी घटकाचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. विषारी घटकांचे प्रमाण वाढल्याने टक्कल पडत आहे. गावकऱ्यांनी अंघोळीसाठी अशुद्ध पाण्याचा वापर करू नये. गरम पाणी वापरावे, अशा सूचना आता देण्यात आल्या आहेत.