सोलापूर : परभणीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याच्या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटले. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाच्या विरोधात आंबेडकरी अनुयायांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंद दरम्यान धुळ्यात १० ते १२ जणांनी एसटी बसवर दगडफेक केली. तर सोलापूरातही तीन एसटी बसवर दगडफेक केली. यात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. काल रात्री सोलापूर एसटी बस आगारात शिवशाहीला अचानक आग लागली. ती जाणूनबुजून लावली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सोलापूरहून तुळजापूरला जाणाऱ्या दोन गाड्या आणि सोलापूरहून साताऱ्याला जाणाऱ्या बसवर दगडफेक झाली. दगडफेकीनंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. दगडफेक नेमकी कुणी केली, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
सोलापूर एसटी बस आगारात उभी असलेली शिवशाही बस जाळली की जळाली, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पोलिसांत याबाबत तक्रार दिली आहे