बीजापूर -छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यातील बासागुडा भागातील जंगलात आज सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने दोन नक्षलवाद्यांना ठार केले. त्यांच्याकडून १२ बोअर बंदूकांबरोबरच अनेक स्फोटकेही जप्त केली आहेत.
काही दिवसांपूर्वी बासागुडा च्या तर्रेम गावातील काही लोकांच्या हत्येत सहभागी असलेले नक्षलवादी या जंगलात उपस्थित असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर डीआरजी, कोब्रा आणि १६८ क्रमांकाच्या तुकडीने काल रात्रीपासून कारवाई सुरु केली. आज सकाळी नक्षलवाद्यांबरोबर त्यांचा सामना झाला. त्यानंतर सुरक्षा दलाने दोन नक्षलवाद्यांना ठार केले. त्यांच्याकडून १२ बोअरच्या दोन बंदूका, १ देशी बनावटीची बंदूक, पाच किलो टिफीन बॉम्ब, काही वायर व इतर स्फोटक साहित्यही जप्त केले. या नक्षलवाद्यांचे मृतदेह बासागुडा पोलीस ठाण्यात आणले गेले.