पंढरपूर – आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरचे वातावरण भक्तीमय झाले. सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत. हे बा… विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकर्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, प्रत्येकाचे दुःख दूर करण्याचे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाच्या चरणी घातले.
आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक केली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, स्वास्थ परिवार मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार समाधान आवतडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मानाचे वारकरी यांचा सत्कार
शेतकरी बाळू शंकर अहिरे, वय 55 वर्षे, आशाबाई बाळू अहिरे वय 50 वर्षे. मु. पो. अंबासन, ता. सटाणा जि. नाशिक यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. यावेळी एसटी महामंडळाकडून मानाच्या वारकर्यांना एक वर्ष मोफत एसटी बस सवलत पास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. हे मानाचे वारकरी मागील 16 वर्षांपासून नियमितपणे वारी करत आहेत.
श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने देण्यात येणारे श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार खालील प्रमाणे देण्यात आले.
संत तुकाराम महाराज वंशज देहूकर दिंडी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, देहू यांना एक लाखाचा प्रथम पुरस्कार मिळाला. दानेवाला निकम दिंडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, पुणे यांना 75 हजार रुपयांचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला तर श्री गुरु बाबासाहेब आजरेकर दिंडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, इंदापूर यांना 50 हजार रुपयांचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. या सर्व पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते
करण्यात आले.
आरोग्यदूतचे प्रकाशन
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने प्रतिवर्षी प्रकाशित करण्यात येणारे आरोग्यदूत या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मेघडंबरीसाठी दोन कोटी 45 लाख रुपयांची चांदी दान करणार्या उद्योजक सुनील मोरगे यांच्याही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रारंभी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली.