बारामतीकरांचे पत्र! रोहितच्या निवडीने जळफळाट? पवारांच्या राजकारणाचा पोलखोल, भाव-भावकीचा ताल

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीबाबत दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी एक खुले पत्र लिहून आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर आता बारामतीकरांची भूमिका या नावाने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका निनावी पत्राने खळबळ उडाली आहे. या पत्रामुळे पवार कुटुंबातील कौटुंबिक राजकारणाचे पोलखोल झाले आहे. मुलगा पार्थ ऐवजी पुतण्या रोहित पवार यांना शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदार संघातून उमेदवारी दिल्यामुळेच जळफळाट होऊन अजित पवार यांनी बंड केले, असा दावा या पत्रामधून करण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी पत्राद्वारे भूमिका मांडताना म्हटले होते की, केवळ राज्याच्या विकासासाठी आपण भाजपाला साथ दिली आहे. कौटुंबिक कलहाचा त्यामध्ये काहीही संबंध नाही. आपण कोणामुळेही दुखावलेलो नाही आणि कोणाला दुखावण्याचाही आपला उद्देश नव्हता. मात्र बारामतीकरांच्या पत्रामुळे पवार कुटुंबियातील वादाला वेगळे वळण लागले आहे. केवळ आपल्या मुलाऐवजी पुतण्याला संधी दिली म्हणून जळफळाट करत अजित पवार यांनी पक्षात फूट पाडून कमळ हाती धरले. बाकी विकास वगैरे बोलण्याच्या गोष्टी आहेत, असे बारामतीकरांच्या पत्रात
म्हटले आहे.

पार्थऐवजी रोहितची निवड करण्यात आली तेव्हापासूनच अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता. पुढे हा दुरावा वाढत गेला आणि अजित पवारांनी काका शरद पवार यांची साथ सोडली,असा थेट दावा या पत्रामध्ये करण्यात आला आहे. पत्राच्या शेवटी ’वाजवा तुतारी, गाडा गद्दारी’ हीच सर्वसामान्य बारामतीकरांची भूमिका आहे असे म्हणत अजित पवारांना बारामतीकरांचा विरोध आहे, असे संकेतही देण्यात
आले आहेत.
दरम्यान, हे पत्र व्हायरल होताच प्रसिध्दी माध्यमांनी पत्राबद्दल छेडले असता, आपल्याला यावर कोणतेही भाष्य करायचे नाही, असे शरद पवार म्हणाले. परंतु शरद पवार यांनी पत्रातून करण्यात आलेला कौटुंबिक कलहाचा दावा खोडूनही काढला नाही.
जेव्हा एकाद्या व्यक्तिवर अन्याय होतो, तेव्हा निनावी पत्रातून भावना व्यक्त केल्या जातात. या पत्राच्या माध्यमातून कोणीतरी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. मी आणि अजित पवार एकाच वयाचे आहोत. अजित पवार 1987 साली राजकारणात आले आणि पुढे पुढे जाऊ लागले. शरद पवार यांचा पुतण्या असल्यामुळे मीही राजकारणात येईन, असे त्यावेळी लोकांना वाटत होते.
छत्रपती कारखान्यात मी रस दाखवला, पण त्यांनी अजित पवारांना संधी दिली. मग शरद पवार मुख्यमंत्री झाल्यावर अजित पवार राजकारणात आले. नंतर मी पुन्हा राजकारणात रस दाखवला, पण शरद पवारांनी रोखले. शरद पवारांनी निर्देश दिल्यानुसार मी शेती, व्यवसाय आणि सामाजिक कार्य करीत राहिलो. त्यातूनच मी रोहितला त्याच्या वयाच्या 21 व्या वर्षी बारामती अ‍ॅग्रो हा मंच तयार करून देऊ शकलो, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांचे पिता राजेंद्र पवार यांनी या पत्राबाबत बोलताना दिली.

बारामतीकरांची भूमिका
अजित दादा पवारांनी हे प्रकरण विनाकारण
भाव-भावकीच्या तालावर आणून ठेवलंय

पवारांच्या घरात शेतकरी कामगार पक्षाचं राजकारण होतं स्व. शारदाबाई पवार या त्यावेळच्या लोकल बोर्डाच्या मेंबर म्हणून निवडून आल्या होत्या नंतर आप्पासाहेब पवार (रोहित पवारांचे आजोबा) आपले बंधू शरद पवार यांच्यासोबत शेकापचं काम करू लागले पण शरदरावांचा ओढा काँग्रेसकडे होता याच पक्षात ते पुढे पुढे जात राहिले आणि आप्पासाहेबांनी शेतीकडे मोर्चा वळविला. पुढची पिढी जेंव्हा तयार होत होती. तेव्हा स्व. अनंतरावांचा मुलगा अजित आणि आप्पासाहेबांचा मुलगा राजेंद्र यांच्यापैकी कोणाला राजकारणात पाठवायचे याबाबत विचार होत होता. तेव्हा दोन्ही भावांनी अनंतरावांच्या मुलासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून राजेंद्र पवारांची क्षमता असूनदेखील अजित पवारांना पुढे केले.
दोघांनीही त्यांना वेळोवेळी सांभाळून देखील घेतले तेंव्हा राजेंद्र पवारांनी बंड केलं नाही पुढचा इतिहास माहितच आहे पण तिसर्‍या पिढीत जेंव्हा पार्थ की रोहित अशी निवड करायची ठरली तेव्हा आप्पासाहेबांचा थेट वारसदार म्हणून रोहितची निवड करून अप्रत्यक्षपणे राजेंद्र पवारांना न्याय देण्यात आला तिथपासून खरा जळफळाट सुरू झाला होता. सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर धाराशीवच्या काड्या पेटल्या आणि तोफांना बत्त्या लागल्या म्हणूनच सामान्य बारामतीकरांची हीच भूमिका आहे की, ‘वाजवा तुतारी गाडा गद्दारी!’

  • एक बारामतीकर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top