छत्रपती संभाजीनगर- अयोध्येतील बाबरी मशीद कारसेवकांनी उद्ध्वस्त केली ही न विसरता येणारी भारताच्या इतिहासातील घटना आहे. त्यानंतर आता भाजपाच्या मौन संमतीने आणि आशीर्वादाने खुलताबाद येथे 317 वर्षांपूर्वी बांधलेली औरंगजेबाची कबर उखडून काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. हीच मागणी करीत आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने राज्यात सर्वत्र जोरदार आंदोलन केले. यावेळी ‘औरंगजेब की कबर खुदेगी शिवछत्रपती की धरती पर’, अशा घोषणा देण्यात आल्या.
औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील वातावरण तापले आहे. अहिल्यानगर शहराजवळील आलमगीर येथे 1707 साली औरंगजेबाचा मृत्यू झाला होता आणि या ठिकाणाहून औरंगजेबाचा मृतदेह दफनविधीसाठी संभाजीनगर या ठिकाणी नेण्यात आला होता. आता सध्या संभाजीनगरमधील औरंगजेबच्या या कबरीवरून महाराष्ट्रात वातावरण तापले आहे. औरंगजेबाची कबर काढून टाकावी अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती करू, असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने दिला होता. आज हीच मागणी करीत छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर, पुणे, नांदेड, जालना, सिल्लोड, जळगाव, गोंदिया, अकोला, पंढरपूर, मालेगाव, ठाणे, मुंबईमध्ये आझाद मैदान, ओशिवरा, मार्वे, बोरीवली, घाटकोपर, मुलुंड, चेंबूर, विक्रोळी, पालघर, भार्इंदर, नालासोपारातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आंदोलन केले आणि जिल्हाधिकाऱ्यांना पुतळा हटवण्याच्या मागणीचे निवेदन दिले.
कोल्हापुरातील आंदोलनावेळी आंदोलकांनी एका टेम्पोमध्ये औरंगजेबची प्रतिकात्मक कबर आणि त्यासोबत औरंगजेबाचा फोटोही ठेवला आणि त्यावर दगड फेकले. नागपूरमध्ये आंदोलकांनी औरंगजेबचे प्रतिकात्मक थडगे आणून त्याला पायदळी तुडवले. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बजरंग दलाने निदर्शने करत रास्ता रोको आंदोलन केले. पुण्यात औरंगजेबच्या फोटोला जोडे मारले. मालेगावात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष करत औरंगजेबाची कबर तोडण्यात यावी, अशा घोषणा दिल्या, गोंदियामध्ये आंदोलकांनी कुदळ घेऊन आंदोलन केले. या आंदोलनाच्या वेळी बजरंग दलाने सरकारला स्पष्ट इशारा दिला की, औरंगजेबाची कबर सरकारनेच हटवावी. जर सरकारने कारवाई केली नाही, तर बजरंग दल कारसेवा करून ही कबर समुद्रात फेकेल. या आंदोलनात राज्यातील बजरंग दलाचे आणि विहिंपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विश्व हिंदू परिषदेने ‘एक धक्का और दो, औरंगजेब की कबर तोड दो, बजरंग दल मैदान में, औरंग्याकी कबर आस्मान में। औरंग्याकी पिल्लोंसे हम लढेंगे। हम लढेंगे’। अशा घोषणा करीत आंदोलन जाहीर केल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण पोलिसांनी खुलताबाद येथे पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. त्या ठिकाणी 600 पोलीस तैनात आहेत. कबरीच्या बाहेर लोखंडी बॅरिकेड लावले आहेत. फक्त एक व्यक्ती जाऊ शकेल एवढीच जागा तिथे ठेवली आहे. याशिवाय औरंगजेबाचा मृत्यू हा अहिल्यानगर जिल्ह्यात झाला होता. त्या ठिकाणाला आलमगीर म्हटले जाते. तिथेही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. याबाबत संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड म्हणाले की, खुलताबादमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून काळजी घेतली जात आहे. काही लोकांना जिल्हाबंदीचे आदेश लागू केले आहेत. संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि तालुका स्तरावरील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी या विषयावर बारकाईने लक्ष ठेवले आहे. विविध ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश काढण्यासाठी सूचना दिल्या आहेत. आमच्याकडे कबर हटवण्याच्या मागणीसाठी निवेदन यायला सुरुवात झाली आहे. कायदा व सुव्यवस्था यासाठी प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत आहे. खुलताबाद येथे कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाकडून अगोदरच कठोर पावले उचलली आहेत. शहरात संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त केला आहे
भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी औरंगजेबाच्या कबरीबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आमच्या महाराष्ट्रामध्ये जी औरंग्याची कबर आहे ती आठवण आम्हाला नको, ही हिंदू समाजाची भावना आहे. ज्या औरंग्याने छत्रपती संभाजी महाराज यांना हाल करून संपविले त्याची कबर कशाला पाहिजे? काहींना ती स्मृती वाटते. तो इतिहास वाटतो. मात्र ती घाण आम्हाला नको आहे. आमच्या स्वराज्याच्या विरोधात उभे राहिले ती घाण नको आहे. ज्यांना ती स्मृती वाटते त्यांनी पाकिस्तानमध्ये घेऊन जावे.
हिंदुत्ववादी संघटनांच्या या आंदोलनावर काँग्रेसने टीका केली आहे. काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, या लोकांना आता दुसरे काहीही काम उरलेले नाही. त्यामुळे त्यांना असे उद्योग सुचत आहेत. महाराष्ट्राची शांतता भंग करण्याचे हे काम आहे. यांनी आधी आपण केलेल्या कामाची कबर खोदावी. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. ते म्हणाले की, राज्यात आणि देशात भाजपाचेच सरकार आहे, मग त्यांना कबरीबाबत निर्णय घेण्यास कोणी अडवले? शासनाने थेट कारवाई करावी, आंदोलन आणि नाटक कशाला करता? हे सगळे संघटनेचीच पिल्ले आहेत, कबर केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. त्यांनी एक शासकीय आदेश काढून कबर हटवण्याची हिंमत दाखवावी.
नागपुरात दोन गटांमध्ये दगडफेक
जाळपोळ! पोलीस जखमी! मोठा तणाव
नागपूरच्या महाल परिसरात आज हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनानंतर 2 गटांत रात्री दगडफेक आणि जाळपोळ झाल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यात काही गाड्या मोठ्या प्रमाणात नासधूस करून पेटवण्यात आल्या. या घटनेत काही पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी शांततेचे आवाहन केले.
महाल परिसरातील शिवाजी चौकात सकाळी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवावी, अशा मागणीसाठी आंदोलन करत जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर हे आंदोलन संपल्यानंतर दुपारीया परिसरात काही तरुण आले आणि आंदोलनात केलेल्या घोषणाबाजीमुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्याचे म्हणू लागले. पोलिसांनी त्यांची समजूत काढत परत पाठवले. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता मोठ्या संख्येने एक गट शिवाजी चौकाच्या जवळ पोहोचला आणि जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यावेळी परिसरातील दुसऱ्या गटानेही घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही गटांना वेगवेगळे केले. पोलिसांनी सर्वांना शिवाजी चौकावरून चिटणीस पार्कच्या दिशेने मागे ढकलले. मात्र चिटणीस पार्कच्या पलीकडे भालदारपुरा परिसरातून पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक आणि गाड्यांची जाळपोळ सुरू केली. पोलिसांनी बळाचा वापर करून स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठ्या आकाराचे दगड पोलिसांच्या दिशेने भिरकावण्यात आले. पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या वापरून जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही दगडफेक आणि जाळपोळ सुरू राहिली. त्यामुळे परिसरातील तणाव सुरुच राहिला. क्रेनला लागलेली आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या एका जवानाला दगड लागल्याने तो जखमी झाला. त्यानंतर पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होणारे शहर आहे. ही नागपूरची कायम परंपरा राहिली आहे. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा.
