बांगलादेशात मी पुन्हा येईन! शेख हसीनांची समर्थकांना ग्वाही

नवी दिल्ली- एकेकाळी बांगलादेशकडे विकासाचे मॉडेल म्हणून पाहिले जात होते; पण आज हा देश दहशतवादी म्हणून गणला जाऊ लागला आहे. माझे वडील, आई, भाऊ आणि कुटुंबातील सर्व सदस्य मी एकाच दिवसात गमावले. जवळच्या व्यक्तीला गमावण्याचे दुःख मला समजते. अल्लाहने मला एका कारणासाठी जिंवत ठेवले आहे.तो मला काही चांगले काम करायला सांगतो. मी बांगलादेशमध्‍ये परत येईन. जे गुन्हे करत आहेत त्यांना शिक्षा होईल. हे माझे वचन आहे, अशी ग्‍वाही बांगलादेशच्‍या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्‍या समर्थकांना दिली.

बांगलादेशातील हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या अवामी लीग नेत्यांच्या कुटुंबियांशी व्हर्च्युअल संवाद साधताना त्‍या बोलत होत्‍या.गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बांगलादेश सोडल्यापासून त्यांनी भारतात आश्रय घेतला आहे.बांगलादेश सरकारचे अंतरिम सल्लागार मोहम्मद युनूस यांच्याबद्दल हसीना म्हणाल्या की, ते अशी व्यक्ती आहेत की ज्यांनी कधीही लोकांवर प्रेम केले नाही. युनूस यांनी गरिबांना जास्त व्याजदराने छोटी कर्ज दिली आणि या पैशातून ते अनेक देशांमध्ये विलासी जीवन जगले. त्यावेळी आम्हाला युनूस यांचा धूर्तपणा समजला नाही म्हणून आम्ही त्यांना मदत करत राहिलो. पण याचा लोकांना काही फायदा झाला नाही; फक्त तेच श्रीमंत होत गेले. नंतर त्यांच्यात सत्तेची भूक निर्माण झाली जी आज बांगलादेशला पेटवत आहे.