अहमदनगर – बांगलादेशमधील अस्थिरतेचा फटका अहमदनगर येथील दूध भुकटी निर्माण करणाऱ्या कारखान्यांना बसला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून १८० कोटींची ९ हजार मॅट्रिक टनहून अधिक दूध भुकटी कारखान्यात पडून आहे.
दूध उत्पादनात अग्रेसर जिल्हा म्हणून अहमदनगरची ओळख आहे, या जिल्ह्यात दुधाची भुकटी बनवणारे आठ कारखाने आहेत. येथील दूध भुकटी, बटर आणि दुधापासून तयार केलेले पदार्थ दुबई, कुवेत, सौदी अरब यासह बांगलादेश आणि अन्य देशात निर्यात केले जातात. बांगलादेशात गेले दोन ते अडीच महिने अस्थिरतेचे वातावरण आहे. त्याचा फटका दूधापासून निर्मिती केलेल्या अन्नपदार्थांनाही बसला आहे. दूध निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांना थेट दूध भुकटी निर्यात होत नसल्याने त्याची आर्थिक झळ बसणार आहे. त्याचप्रमाणे बांगलादेशात भारतातून कांदा, टोमॅटो, डाळिंब मोठ्या प्रमाणात निर्यात होते. त्या उत्पादनालाही फटका सहन करावा लागत आहे.