बदलापूरचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरीत! बाहेरून माणसे आणली मुख्यमंत्री शिंदे यांच्या वक्तव्याने संतापाची लाट उसळली

बदलापूर – बदलापूरमध्ये 13 ऑगस्टला आदर्श शाळेत दोन चिमुरड्यांवर अत्याचार झाला होता. या घटनेचे काल बदलापुरात तीव्र पडसाद उमटले होते. या घटनेनंतर आज बदलापूरमध्ये तणावपूर्ण शांतता होती. परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून, कलम 163 लागू करण्यात आले. या घटनेचे आज राज्यात पडसाद उमटले. ‘आरोपीला फाशी द्या, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा,’ अशी मागणी करत बदलापूर, मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सांगली आदी ठिकाणी निदर्शने करण्यात आली. दरम्यान आज आरोपी अक्षय शिंदे याला न्यायालयात हजर केले असता त्याला आणखी पाच दिवस म्हणजे 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपी शिंदेला पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. मात्र या नराधमाविरोधात आंदोलन करणार्‍या 22 आंदोलकांना आज कोर्टाने थेट 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यामुळे या सर्व आंदोलकांचे नातेवाईक आणि हितचिंतक संतप्त झाले होते. या आंदोलकांना मोफत कायदेशीर मदत करण्यासाठी आज बदलापूरच्या न्यायालयातील सर्व वकिलांनी कल्याण कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. या प्रकाराने वातावरणात तणाव निर्माण झालेला असतानाच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याने राग अधिकच उफाळून आला. मुख्यमंत्री शिंदे आज सकाळीच पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, काल बदलापुरात झालेले आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरीत होते. आंदोलनात हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच स्थानिक सहभागी होते. बाकी सर्व गर्दी बाहेरून आणलेली होती. गाड्या भरभरून माणसे आणली गेली. त्याचे सीसीटीव्ही फुटेज आहेत. बदलापूरच्या घटनेचा राजकीय फायदा घेण्यासाठी आणि ‘लाडकी बहीण’ योजना बदनाम करण्यासाठी काही जण तिथे फलक घेऊन उभे होते. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याने बदलापुरात संताप पसरला. यावर स्थानिक नागरिक असलेल्या नरेन गुप्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, माझा वृत्तपत्र विक्रीचा स्टॉल स्टेशन समोर आहे. दिवसभर मी येथे होतो. गाड्या भरून आलेले लोक मी पाहिले नाही. दोन लहान मुलींसोबत गंभीर प्रकार घडला आहे. त्याविरोधात न्याय मागण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले होते. न्याय मागणार्‍या लोकांवर गुन्हे दाखल केले हे चुकीचे आहे. आंदोलनकर्त्यांनी काहीही चुकीचे केलेले नाही. दरम्यान, आरोपी अक्षय शिंदेच्या घराची काही जणांनी दगडफेक करुन तोडफोड केली.
आदर्श शाळेतील दोन लहान मुलींवर सफाई काम करणार्‍या अक्षय शिंदेने अत्याचार केला. ही घटना 13 ऑगस्ट रोजी घडली होती. यापैकी एका मुलीने आपल्याला लघवीच्या जागी मुंग्या चावत आहेत असे सांगितल्यावर डॉक्टरकडे नेण्यात आले. तेथे लैंगिक अत्याचार झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पालकांनी बदलापूर पोलीस ठाणे गाठले. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते रात्री 9, 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते रात्री 1 वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्यासाठी पालकांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. पोलीस तक्रार नोंदवत नसल्याने अखेर रात्री 1 वाजता मनसे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात आल्यावर मध्यरात्री 3 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी 17 ऑगस्टला अटक करून कल्याण कोर्टात हजर केले असता त्याला 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती.
आज या प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडी संपली. आरोपीच्या विरोधात सध्या प्रचंड जनक्षोभ असल्याने पोलिसांनी मोठ्या सुरक्षेत त्याला न्यायालयात हजर केले. सरकारी वकिलांनी हे प्रकरण गंभीर असून, या प्रकरणाची अधिक चौकशी करण्याची गरज आहे. त्यासाठी पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करत 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आरोपीने केलेले कृत्य निषेधार्य असल्याने कल्याण न्यायालयातील वकिलांनी त्याचे वकीलपत्र घेऊ नये, असे आवाहन वकील संघटनेने केले. त्यामुळे आरोपीच्यावतीने एकही वकील न्यायालयात उभा राहिला नाही.
बदलापूरमध्ये आज तणावपूर्ण शांतता होती. कालच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कलम 163 लागू करण्यात आले होते. आज शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. अत्यावश्यक सेवा, दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. शहरातील अनेक रस्त्यांवर शुकशुकाट होता. चुकीची माहिती पसरू नये म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. कालच्या आंदोलनाप्रकरणी 300 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, 40 जणांना अटक करण्यात आली आहे. आज 22 जणांना कल्याण कोर्टात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आंदोलकांना कोठडी सुनावताच त्यांच्या नातेवाईकांना अश्रू अनावर झाले. यापैकी एक असलेल्या रोहित घोलप यांच्या आईने म्हटले की, माझा मुलगा बीकेसी येथे डायमंड कंपनीत कामाला आहे. तो बघायला गेला होता. त्याला पोलिसांनी अटक केली. माझ्या मुलाला सोडा. दरम्यान एसआयटीच्या प्रमुख आरती सिंग यांनी पीडित कुटुंबाची आज भेट घेतली.
बदलापूर अत्याचार घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज पुण्यात बालगंधर्व चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. आंदोलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा राजीनामा मागण्यात आला. महिला आयोग हाय हाय, महिलांना सुरक्षा द्या, नराधमांना फाशी द्या, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ज्यांनी बलात्कार केला त्याची चौकशी करण्याऐवजी ज्यांनी आंदोलन केले त्यांच्यावर सरकार गुन्हे दाखल करत आहे. बलात्कार करणार्‍याच्या विरोधात आंदोलन केले. जर हा गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे. या सरकारने मला फाशीची शिक्षा द्यावी. महिला जोपर्यंत सुरक्षित होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार. या घटनेच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बदलापूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांना रामगिरी महाराजांना भेटायला वेळ आहे. पण, पीडित मुलीच्या घरच्यांना भेटायला वेळ नाही. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पीडित महिला पत्रकाराला सोबत आणून गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली. मुंबईत मंत्रालय येथे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. दादर, लालबाग येथे ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली बांगड्या आणि टरबूज फोडून आंदोलन करण्यात आले. याचप्रमाणे नांदेड येथे ठाकरे गटाने तर सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने आंदोलन केले. सातारा येथे आरपीआयकडूनमोर्चा काढण्यात आला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे. त्यात मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात कायदा धाब्यावर बसवला आहे. जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन स्वतःचे ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकार्‍यांमुळे हा विषय आज समोर आला याचा मला अभिमान आहे. असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, बदलापूर असो की पश्चिम बंगाल असो, अशा नराधमांना फाशीची शिक्षा द्या. आरोपीला कडक शासन करा. असा दरारा निर्माण करा की असा प्रकार पुन्हा कोणीही करणार नाही.

वामन म्हात्रेंच्या विरोधात
विनयभंग-अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचाराची घटना निदर्शनास आल्यावर त्याचे तीव्र पडसाद उमटले. या घटनेचे वार्तांकन करणार्‍या महिला पत्रकाराविरोधात शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी, ’तू अशा बातम्या देते जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या प्रकरणी आज म्हात्रेंच्या विरोधात विनयभंग आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचाराच्या घटनेनंतर आदर्श शाळा आणि रेल्वे स्टेशन परिसरात तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे वार्तांकन संबंधित महिला पत्रकार करत होती. सकाळी वार्तांकन करून पत्रकार आपल्या घरी गेली होती. दुपारी जेवून पुन्हा वार्तांकन करण्यासाठी पत्रकार जात असताना समोरून वामन म्हात्रे आले. त्यांनी तिला ’तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केले. म्हात्रे यांच्या वक्तव्याचा पत्रकार संघटनांनी निषेध नोंदवला आहे.
आपल्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्याची तक्रार करण्यासाठी महिला पत्रकार काल बदलापूर पोलीस ठाण्यात गेली होती. मात्र त्यावेळी पोलिसांनी आम्हाला इतर कामे आहेत, असे सांगून तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. आज बदलापूर घटनेच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी आव्हाड यांनी संबंधित पत्रकाराची तक्रार नोंदवण्यास सांगितल्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वामन म्हात्रे यांच्या विरोधात विनयभंग आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top