नवी दिल्ली- फरार मद्य सम्राट विजय मल्ल्या याने दावा केला आहे की, भारतीय बॅंकांनी त्याची १४,१३१.६ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. ही रक्कम सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्याला दिलेल्या कर्जाच्या दुप्पट आहे. अर्थ मंत्रालयाच्या २०२४-२५ च्या वार्षिक अहवालात अंमलबजावणी संचालनालयाच्या वसुलीच्या तपशिलांचा संदर्भ देत मल्ल्याने ही माहिती दिली आहे.
कर्ज वसुली न्यायाधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार ६,२०३ कोटी रुपयांच्या थकबाकीपोटी बँकांनी यापूर्वीच १४,१३१.८ कोटी रुपये वसूल केल्याचे मल्ल्याने म्हटले आहे. याचा पुरावा माझ्या युकेमधील दिवाळखोरी रद्द करण्याच्या अर्जात आहे.इतकी वसुली झाल्यावर आता यूके न्यायालयात बँका कोणती भूमिका घेतील यावर माझे लक्ष आहे असेही तो म्हणाला. मल्ल्यासह इतर १० फरारी आर्थिक गुन्हेगारांचे तपशील सांगताना अहवालात म्हटले आहे की ३६ व्यक्तींच्या संदर्भात एकूण ४४ प्रत्यार्पण विनंती विविध देशांना पाठवण्यात आल्या आहेत. मंत्रालयाच्या वार्षिक अहवालानुसार, मल्ल्या प्रकरणातील १४,१३१.६ कोटी रुपयांची जप्त मालमत्ता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडे सोपवण्यात आली आहे. ईडीच्या प्रयत्नांमुळे विविध फरारी आर्थिक गुन्हेगार आणि इतर आरोपींच्या प्रत्यार्पणासाठी परदेशातील सक्षम न्यायालयासमोर यशस्वीपणे प्रतिनिधित्व केले आहे.यूके न्यायालयाने या तपास यंत्रणांच्या प्रयत्नामुळे आणि भारतीय दूतावासाच्या समन्वयाने काही प्रमुख आरोपींचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली आहे.