नाशिक – विधानसभा निकालाच्या फेरमतमोजणीसाठी नाशिक जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार व जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर प्रतियुनिट ४० हजार व १८ % जीएसटी रक्कम भरणार आहेत. २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. मात्र या निकालावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. मविआ नेत्यांनी ईव्हीएमवर शंका घेत, फेरमतमोजणीची मागणी केली.
दरम्यान, सुधाकर बडगुजर यांनी नाशिकचा निकाल अमान्य करत २५ नोव्हेंबरला १२९ मतदान केंद्रांची फेरमतमोजणीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. यासंदर्भातील जिल्हाधिकाऱ्यांचे लेखी सूचनापत्र समोर आले आहे. यानुसार २६ एप्रिल २०२४ च्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एकूण मतदान केंद्रांपैकी ५ टक्के केंद्रांची फेरमतमोजणी होवू शकते. या सुचनेनुसार बडगुजर यांना एकूण केंद्रांपैकी ५ टक्के केंद्रांची फेरमतमोजणीची मागणी करता येणार आहे.
सुधाकर बडगुजर म्हणाले की १२९ मतदान केंद्रांची फेरमतमोजणी व्हावी, अशी मागणी केली होती.परंतु नियमानुसार केवळ ५ टक्के केंद्रांची मतमोजणी करता येणर आहे.त्यानुसार ५ टक्के केंद्रांची निवड करून उद्या प्रती युनिट ४० हजार आणि १८ टक्के जीएसटीची रक्कम भरून फेरमतमोजणीसाठी आग्रह धरू.