फुले वाडा परिसराच्या आरक्षणास मंजुरी

पुणे- पुणे शहरातील महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकांच्या शेजारचा परिसर आरक्षित करायला शासनाची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे स्मारक परिसरातील भूसंपादनाचा व या दोन्ही स्मारकांचे विस्तारीकरण व विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पाठपुरावा केला होता.

१९९२ साली पुणे शहरातील महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे राहते घर राष्ट्राला अर्पण करून सदर वास्तू राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली होती. महात्मा फुले यांच्या राज्य संरक्षित स्मारकाशेजारी दिडशे मीटर अंतरावर पुणे महानगरपालिकेच्या मिळकतीमध्ये महानगरपालिकेमार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे काम करण्यात आलेले आहे. या दोन्ही स्मारकांना जोडण्यासाठी रस्ता करण्याचे नियोजित आहे. तेथे राहणाऱ्या रहिवाशांचे अन्यत्र पुनर्वसन करून रस्ता करण्याचे प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे फुले वाड्याच्या आजूबाजूला राहत असलेल्या काही नागरिकांच्या जागा संपादित करून या स्मारकाच्या विस्तारासाठी प्रशस्त जागा उपलब्ध करण्याची मागणी आहे. शासनाकडून महात्मा फुले वाडा स्मारक ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रीकरण विस्तारीकरण म्हणून आरक्षित करण्याच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने या दोन्ही स्मारकांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top