‘फुकट’ची खैरात की, किळसवाणे राजकारण! जनतेने मतदान वाढवत कोणता निर्णय घेतला?

मुंबई- अत्यंत गलिच्छ राजकारण, बेलगाम अर्वाच्च भाषणे, निर्लज्ज फोडाफोडी आणि उमेदवार पळवापळवी यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेला नकोशी झालेली विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. आज महाराष्ट्राच्या जनतेने उत्साहाने मतदान करून गेल्या वेळचा 61.44 टक्के मतदानाचा टप्पा पार केला. यामुळे उत्सुकता अधिकच वाढली आहे. हे अधिकचे मतदान कुणाच्या पारड्यात पडेल, महाराष्ट्रातून सौदेबाजीचे राजकारण तडीपार करण्याचा निर्णय मतदारांनी घेतला की, फुकट योजनांच्या खैरातीला मतदारांनी पसंती दिली, याचा निर्णय आज मतपेटीत बंद झाला आहे. आजच्या मतावर महाराष्ट्राचे राजकारण अवलंबून आहे.
आज सुमारे 64.50 टक्के मतदान झाले. 2019च्या निवडणुकीपेक्षा हे मतदान अधिक असल्याने मतदारांनी भरभरून महायुतीला मतदान केले की, मविआला सत्तेत आणण्यासाठी मतदान केले हे शनिवारी 23 नोव्हेंबरलाच कळेल. मतदानानंतर विविध वाहिन्यांवर दाखविलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीचीच सरशी दाखविण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस येतात का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 74.98 टक्के मतदान कोल्हापूरमध्ये झाले. तर सर्वात कमी म्हणजेच 50.98 टक्के मतदान मुंबई शहरात झाले. गडचिरोलीसारख्या नक्षलवादी भागातही मतदानाचा टक्का वाढला. तेथे 72.15 टक्के मतदान झाले.
आज मतदानाचा टक्का वाढला असला तरी महाराष्ट्राचा निवडणूक इतिहासात प्रथमच राज्यभर विविध मतदान केंद्रांवर हिंसक घटना घटल्या. भाजपा आणि शरद पवार गट, शिंदे गट आणि उबाठा अशा विविध गटांच्या कार्यकर्त्यांनी अनेक मतदान केंद्रांवर एकमेकांविरोधात तक्रारी केल्या. कार्यकर्त्यांची हाणामारी, ईव्हीएम मशीन फोडणे, कोणाला मतदान करायचे याची सूचना देणे, नेत्याची एकमेकांशी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, मतदारांना वाहनातून आणणे, मतदान केंद्रात वीज गायब होणे असे असंख्य प्रकार आज घडले. यापूर्वी इतक्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये तणाव कधीही दिसलेला नव्हता. पैसे वाटपाच्या घटनांवरून आजही मारहाण झाली. पोलिसांनी सर्वत्र सतर्क राहून आपली कामगिरी चोख बजावली. याबाबत काँग्रेसने आयोगाकडे अनेक लेखी तक्रारी केल्या. मात्र निवडणूक आयोगाने काँग्रेस लिगल कमिटीचा ई-मेलच ब्लॉक करून टाकला. काँग्रेसने ट्वीट करून ही माहिती देत तक्रार केली आहे.
झारखंड दुसऱ्या टप्प्यात 65.27 टक्के
उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीत 52 टक्के

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज 38 मतदारसंघांत 65 पूर्णांक 27 टक्के मतदान झाले. झारखंडमधील पहिल्या टप्प्याचे मतदान 13 नोव्हेंबरला झाले होते. याबरोबरच आज उत्तर प्रदेशातील 9 मतदारसंघांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीसाठीही सरासरी 52 टक्के मतदान झाले. आज पंजाबच्या 4, केरळच्या एक व उत्तराखंडच्या एका जागेवर पोटनिवडणूक झाली.
झारखंडच्या गोड्डा, महागामा, दुमका, जामा, जारमुंडी, शिकारीपाडा, बोकारो, धनबाद, हजारीबाग आदी मतदारसंघात मतदान झाले. झारखंडमधील मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदानात भाग घेतला. झारखंडच्या सर्वच भागांत शांततेत मतदान झाले.
उत्तर प्रदेशातील मिरपूर, कुंदरकी, गाझियाबाद, खैर, करहाल, सिसामाऊ, फुलपूर, काटेहारी, मजहवन या नऊ जागांसाठी आज मतदान झाले. यावेळी अनेक मतदारसंघांत हाणामाऱ्या झाल्या. काही ठिकाणी बोगस मतदान झाल्याच्या घटना घडल्या असून, मुस्लीम महिलांची ओळख पटवतानाही गोंधळ झाला. उत्तर प्रदेशमध्ये भाजपा व समाजवादी पक्षात मुख्य लढत आहे.
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
अहमदनगर – 67.08 टक्के
अकोला – 60.23 टक्के
अमरावती -65.57 टक्के
औरंगाबाद- 64.13 टक्के
बीड – 61.64 टक्के
भंडारा- 65.88 टक्के
बुलडाणा-69.10 टक्के
चंद्रपूर- 65.89 टक्के
धुळे – 64.70 टक्के
गडचिरोली-72.15 टक्के
गोंदिया -66.06 टक्के
हिंगोली – 71.05 टक्के
जळगाव – 60.37 टक्के
जालना- 62.30 टक्के
कोल्हापूर- 74.98 टक्के
लातूर – 66.91 टक्के
मुंबई शहर- 50.98 टक्के
मुंबई उपनगर- 55.07 टक्के
नागपूर – 57.83 टक्के
नांदेड – 56.69 टक्के
नंदुरबार- 69.15 टक्के
नाशिक -65.72 टक्के
उस्मानाबाद- 64.27 टक्के
पालघर- 65.26 टक्के
परभणी- 70.38 टक्के
पुणे – 57.93 टक्के
रायगड – 63.57 टक्के
रत्नागिरी- 63.35 टक्के
सांगली – 66.28 टक्के
सातारा – 66.85 टक्के
सिंधुदुर्ग – 66.30 टक्के
सोलापूर -66.72 टक्के
ठाणे – 53.57 टक्के,
वर्धा – 68.30 टक्के
वाशिम – 63.45 टक्के
यवतमाळ – 69.02 टक्के

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top