फलटण- फलटण शहरातील ऐतिहासिक श्रीराम रथोत्सवाचा काल दिमाखात प्रारंभ झाला. कालपासून मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. प्रतिवर्षी ही मिरवणूक पाहण्यासाठी व दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते.
ऐतिहासिक श्रीराम रथोत्सव प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे. मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदा सोमवार २ डिसेंबर हा या यात्रेचा मुख्य दिवस आहे. यादिवशी श्रीरामाचा रथ नगर प्रदक्षिणेसाठी निघणार असून परंपरागत मार्गाने नगर प्रदक्षिणा पूर्ण करुन सायंकाळी श्रीराम मंदिरात पोहोचणार आहे.रविवार १ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत प्रभू श्रीरामाच्या रथाला लघुरुद्राभिषेक करण्यात येणार आहे.सोमवार २ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत श्रीराम मंदिरात कीर्तन झाल्यानंतर प्रभू रामचंद्राची मूर्ती राज घराण्यातील मान्यवरांच्या हस्ते रथामध्ये ठेवण्यात येणार आहे.त्यानंतर रथ सोहळा परंपरागत पद्धतीने शहरातील रथ मार्गावरुन मिरवणुकीसाठी मार्गस्थ होणार आहे.शहरातील प्रमुख मार्गावरुन फिरुन सायंकाळी ७ वाजता रथ सोहळा श्रीराम मंदिरात परत येईल.त्यानंतर शुक्रवार .६ डिसेंबर रोजी श्रींची पाकाळणी,सकाळी काकड आरती आणि नंतर ११ ब्राह्मणांच्याकडून लघुरुद्र व महापूजा झाल्यानंतर या यात्रेची सांगता होणार आहे.