‘फक्त 3 हजार रुपये भरा अन् वर्षभर महामार्गावरून प्रवास करा’, टोलबाबत सरकार लवकरच नवीन नियम लागू करण्याची शक्यता

Toll Tax Free : राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना मोठ्या प्रमाणात टोल भरावा लागतो. फास्टॅगमुळे टोल नाक्यावर लागणाऱ्या वाहनांच्या रांगा काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. असे असले तरीही सरकारकडून वाहन चालकांच्या सुविधेसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहे. केंद्र सरकारकडून लवकरच टोल नाक्यांवर वार्षिक किंवा कायमस्वरुपाची टोल सुविधा सुरू केली जाण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार प्रवाशांना केवळ 3,000 रुपयांत टोल पासद्वारे प्रवास करण्याची सुविधा मिळणार आहे.  म्हणजेच, केवळ 3 हजार रुपये भरून प्रवाशांना वर्षभर विना टोलचे राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करता येणार आहे.

याशिवाय, 15 वर्षांसाठी टोल पासची रक्कम 30 हजार रुपये असण्याची शक्यता आहे. ही योजना लागू झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना याचा फायदा होईल आणि टोल नाक्यांवरील गर्दी देखील कमी होण्यास मदत होईल.   

सध्या या प्रस्तावावर रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून विचार केला जात आहे. मंत्रालय कारसाठी प्रति किमी टोल दर कमी करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळेल. या नवीन टोल पाससाठी कोणतेही नवीन कार्ड घेण्याची गरज पडणार नाही. ही सुविधा थेट फास्टॅगशी जोडली जाणार आहे.

सध्या प्रत्येक 60 किमी अंतरावर एक टोल नाका आहे. या टोल नाक्यांवर ठराविक शुल्क भरल्याशिवाय पुढे जाता येत नाही. मात्र, आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाने घेतलेल्या निर्णयांमुळे वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. 

सध्या टोल नाक्यांवर मासिक पास उपलब्ध आहे. हा मासिक पास 340 रुपयांना मिळतो, तर वार्षिक शुल्क 4,080 रुपये आहे. मात्र, आता जर संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग नेटवर्कसाठी अमर्यादित प्रवासासाठी केवळ 3,000 रुपये आकारले गेले, तर शेकडो वाहनचालकांना याचा फायदा होईल. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देखील टोल नाक्यांवरील पास योजनेवर सध्या विचार सुरू असल्याची माहिती दिली आहे.