प्रवासी भारतीय दिवस का आहे खास? जाणून घ्या या विषयी सर्व माहिती

Pravasi Bharatiya Diwas 2025: दरवर्षी 9 जानेवारी हा प्रवासी भारतीय दिवस (Pravasi Bharatiya Diwas 2025) म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्ताने सरकारकडून प्रवासी भारतीयांच्या सन्मानार्थ विविध परिषदा आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अनिवासी भारतीय समुदायाच्या त्यांच्या मातृभूमीप्रति योगदानाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

 या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होण्यामागचे कारण म्हणजे याच दिवशी 1915 साली राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते. यावर्षी 18वा प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जात आहे. यासाठी ओडिसामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. यावर्षी भारतीय प्रवासी दिवस संमेलनाची थीम (Pravasi Bharatiya Diwas 2025 Theme) ‘विकसित भारतासाठी समुदायाचे योगदान’ ही आहे.

2003 पासून प्रवासी भारतीय दिनाची सुरुवात

सरकारकडून  वर्ष 2003 पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. 2003 मध्ये तत्कालीन पंतप्रधान दिवंगत  अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या कार्यकाळात, परदेशातील भारतीय समुदायाला ओळख मिळवून देण्यासाठी आणि त्यांना सहभागी करून घेण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून प्रवासी भारतीय दिवस संमेलनाची (Pravasi Bharatiya Diwas) प्रथम सुरुवात झाली होती. सुरुवातीला हा दिवस दरवर्षी साजरा केला जात असे. त्यानंतर 2015 पासून द्विवार्षिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

प्रवासी भारतीय दिवसाला आहे विशेष महत्त्व

भारतात या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. 9 जानेवारीच्या दिवशी हा दिवस साजरा करण्याचे कारण म्हणजे याच दिवशी 1915 मध्ये महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले आणि भारतीयांच्या जीवनाला कायमस्वरूपी बदल घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

परराष्ट्र मंत्रालयाकडून या दिनानिमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षीच्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनात सहभागी होण्यासाठी 50 पेक्षा अधिक देशांमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी नोंदणी केली आहे.