प्रयागराज – प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्यासाठी स्थानिक प्रशासनासह साधू आणि संतांची जोरदार लगबग सुरू असताना आज सकाळी श्री पंच दशनम आखाडा शाही थाटात महाकुंभ मेळाव्यासाठी प्रयागराज येथे पोहोचला. घोडे, उंट, रथ आणि गाड्यांवर स्वार होऊन ढोल-ताशा आणि शंखांच्या जयघोषात साधू-संतांनी छावणीत प्रवेश केला. संतांची मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.भाला, त्रिशूळ आणि तलवार घेऊन ऋषी-मुनी रस्त्यावरून चालत होते. डीजे आणि ढोलताशाच्या तालावर संतांनी नृत्य केले. अंगावर भस्म विभूतीसह चंदन, विभूती टिळक लावत हर-हर महादेवच्या घोषणा देत संतांचा जत्था पुढे सरकत होता. या मिरवणुकीमुळे प्रयागराज-रेवा रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी वळवण्यात आली होती. परिणामी परिसरातील रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मिरवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. १४ डिसेंबर रोजी जुना आखाड्याच्या मिरवणुकीमुळे प्रयागराज-मिर्झापूर, प्रयागराज-रेवा आणि प्रयागराज-वाराणसी महामार्गावर सहा तास वाहतूक कोंडी झाली
