Republic Day 2025: प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभरात उत्साहात तयारी सुरू आहे. यंदा भारत 76वा प्रजासत्ताक दिन (76th Republic Day) साजरा करत आहे. यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, देशभरातून अनेकांना प्रजासत्ताक दिन परेड कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून जवळपास 250 जणांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
जनसामान्यांचा सहभाग वाढवण्यासाठी भारत सरकारकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. यंदा दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी महाराष्ट्रातून सुमारे 250 मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे.
विविध 19 क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या प्रतिनिधींना विशेष पाहुणे म्हणून या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. राज्यातील 250 पाहुण्यांची विविध क्षेत्रांमधून निवड करण्यात आली आहे. ज्यामध्ये पीएम किसान समृद्धी योजना (09), पीएम किसान योजना (03), मन की बात (10), युथ अफेर्स (12), ग्रामीण विकास (14), आदिवासी कार्य (29), पर्यावरण, जंगल व हवामान (04), सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी (05), सरपंच (34), PACs M/O सहकार्य (17), मच्छीमार योजना (06), पीएम यशस्वी योजना (12), सर्वोत्कृष्ट पेटंट धारक (01), कापड (हस्तकला) (12), पाणी समिती (पेयजल व स्वच्छता) (09), सर्वोत्कृष्ट स्टार्टअप (01), कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड (07), FPO (05) आणि भारत स्वयंसेवक (03) या क्षेत्रांचा समावेश आहे.
याद्वारे राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये जनसामान्यांचा सहभाग वाढवणे व विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय व्यक्तींच्या योगदानाची ओळख पटवणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे.