पोखरण अणुचाचणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉ. आर चिदंबरम यांचे निधन, जाणून घ्या त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती

R Chidambaram Death : भारताचे ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम (R Chidambaram) यांचे निधन झाले आहे. ते 88 वर्षांचे होते. मुंबईतील जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्याकाही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. भारताच्या अण्वस्त्र कार्यक्रमाची अंमलबाजवणी करण्यामध्ये त्यांची मुख्य भूमिका होती.

 भारत-अमेरिका नागरी अणुकराराला अंतिम रूप देण्यात त्यांचा सहभाग होता. याशिवाय, 1974 आणि 1998 मध्ये भारताने केलेल्या आण्विक चाचण्यांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या या क्षेत्रातील कामांसाठी अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्य केले.

डॉ. राजगोपाल चिदंबरम (R Chidambaram) यांनी चेन्नईतील प्रेसिडेन्सी कॉलेज आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरू येथून शिक्षण पूर्ण केले. ते 1974 ला पोखरण (Pokhran Nuclear Tests) येथे भारताची पहिली अणुचाचणी (स्माइलिंग बुद्धा) करणाऱ्या टीमचा भाग होते. तसेच, 1998 मध्ये पोखरण येथे केलेल्या भारताच्या दुसऱ्या अणुचाचणीवेळी एपीजे अब्दुल कलाम यांच्या टीमचा भाग होते.

डॉ. राजगोपाल चिदंबरम (R Chidambaram) यांची 1993 साली अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. वर्ष 2000 पर्यंत ते या पदावर होते. अनेक वर्ष ते भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणूनही कार्यरत होते. तसेच, भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या (IAEA) बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना 1975 ला पद्मश्री आणि 1999 साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.