नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर मध्ये झालेल्या कारवाईत अनेक घरे तोडण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांच्या व अधिकाऱ्यांच्या भितीने एक लहान शाळकरी मुलगी तुटणाऱ्या घरातून आपली पुस्तके घेऊन पळाली होती. तिचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारची समाजाच्या सर्व स्तरातून छिथू झाली होती. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानेही दखल घेतली आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या अशा प्रकारच्या बेकायदेशीर कारवाई बद्दल न्यायालयाने तीव्र शब्दात ताशेरे ओढले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्जल भूयान यांनी म्हटले आहे की, अशा प्रकारच्या व्हिडीओचे सगळ्यांनाच वाईट वाटते. या प्रकरे लोकांची घरे तोडणे हे बेकायदेशीर तर आहेच ते अमानवीय आहे. या मुलीच्या व्हिडिओमधील घरापेक्षा आपल्या शिक्षणाला अधिक महत्त्व देणाऱ्या या मुलीप्रती सर्वांनी आदर व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारे मनमानी पद्धतीने घरे तोडण्यावरुन सर्वांनी टीकाही केली होती. एका गुन्हेगाराच्या जागेवर कारवाई करताना आपण एका शिक्षण घेणाऱ्या मुलीवर अन्याय करत असल्याकडे सरकारने काहीच लक्ष दिले नव्हते त्यावरही सार्वत्रिक टीका होत आहे.