Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे सर्वात मोठा धार्मिक सोहळा असलेल्या महाकुंभचे आयोजन करण्यात आले आहे. 26 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महाकुंभमध्ये जगभरातून कोट्यावधी नागरिक उपस्थित राहत आहे. महाराष्ट्रातूनही लाखो भाविकांनी महाकुंभ मेळ्यात उपस्थित राहत पवित्र स्नान केले. त्यातच आता पुणेकरांना देखील अगदी सहजरित्या प्रयागराजला जाता येणार आहे.
इंडिगो एअरलाइन्सने पुणे-प्रयागराज दरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही सेवा 16 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणार असून आठवड्यात सहा दिवस उपलब्ध असेल.
ही नवीन विमानसेवा पुणेकर आणि आसपासच्या भागातील हजारो भाविकांसाठी अधिक वेगवान आणि आरामदायक प्रवास पर्याय उपलब्ध करून देणार आहे. पुणे ते प्रयागराज विमानसेवा दुपारी 2:00 ते संध्याकाळी 4:10 वाजता असेल. तर प्रयागराज ते पुणे विमानसेवाचा कालावधी सकाळी 11:10 ते दुपारी 1:10 असा असेल.
रेल्वे आणि रस्त्याने प्रवास करावा लागत असल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, आता या विमानसेवेच्या माध्यमातून भाविकांना आरामदायक प्रवास करत प्रयागराजला पोहोचता येणार आहे. एअरलाइन्सने देखील मागणी पाहता प्रवाशांना लवकरात तिकीट बुक करण्याचा सल्ला दिला आहे.