पुणे – पुणे शहरात झिका रुग्णांची संख्या २३ वर पोहोचली आहे. तर महिन्याभरात डेंग्यूचे २१६ संशयित रुग्ण आढळले आहेत. पुण्यात झिका पाठोपाठ डेंग्यूचा कहर झाला असून रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यात एकाच आठवड्यात तब्बल १५६ रुग्णांची नोंद झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून स्वच्छता बाळगण्याचे आणि डासांपासून बचाव करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पुणे शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येतील वाढ होत आहे. महिन्याभरात डेंग्यूचे एकूण २१६ संशयित रुग्ण सापडले आहेत. पावसाळ्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांत वाढ होत असल्याचे सांगितले जाते. जानेवारीत ९६, फेब्रुवारीमध्ये ७५, मार्च महिन्यात ६४, एप्रिलमध्ये ५१ आणि मे महिन्यात ४४ अशी डेंग्यू रुग्णसंख्या आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्यापासून रूग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. शहरात वर्षभरात डेंग्यूचे ७०३ संशयित रुग्ण आढळले आहेत.