Pune Police: पुणे शहरात वाहतुकीचे समस्या प्रचंड मोठी आहे. वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहनचालक या सर्व समस्या सोडवण्यासाठी पोलिसांकडून विविध उपक्रम देखील वापरले जातात. आता वाहूतक पोलिसांनी पुणे ट्रॅफिक मिटिगेशन इंटर्नशिप प्रोग्राम’ सुरू केला आहे.
पुणे शहरातील वाहतूक समस्यांबाबत तसेच वाहतूक पोलिसांना भेडसावणाऱ्या आव्हानांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी या इंटर्नशिप प्रोग्रामला सुरूवात करण्यात आली आहे.
हा उपक्रम पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोलॅबोरेटिव्ह रिस्पॉन्स (PPCR), टॉप मॅनेजमेंट कन्सोर्टियम फाउंडेशन (TMCF) आणि जहांगीर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आला.
पुणे शहर वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या इंटर्नशिप प्रोग्राम अंतर्गत लेक्सिकॉन कॉलेज, पुणे येथील पहिल्या तुकडीतील विद्यार्थ्यांना शहरातील विविध वाहतूक परिस्थितींवरील प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रोग्रामंतर्गत विद्यार्थ्यांना शहरातील वाहतूक समस्या, व्यवस्थापन आणि भविष्यातील नियोजनाची माहिती देण्यात आली. तसेच गूगल मॅप्स आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसारख्या तांत्रिक प्रणालींविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शहरातील 32 प्रमुख रस्त्यांवरील सुधारणा ही त्यांना समजावून सांगण्यात आल्या.
वाहतूक पोलिसांची प्रत्यक्ष कार्यपद्धती समजावी यासाठी पुण्यातील गजबजलेल्या चौकांमध्ये वाहतूक नियंत्रण कसे केले जाते याचा अनुभव देखील देण्यात आला. तसेच ई-चलान प्रणाली, वाहन टोइंग आणि स्पीड गन मशीन वापराबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.