Pune Metro: गेली अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून पुणे मेट्रोच्या वेळेत वाढ करावी अशी मागणी केली जात होती. अखेर, प्रजासत्ताक दिनापासून पुणे मेट्रोच्या सेवेत एक तासांनी वाढ करण्यात आली आहे. रात्रीचा प्रवास करणाऱ्यांना यामुळे फायदा होणार आहे. आता पुणे मेट्रो सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 ऐवजी रात्री 11 पर्यंत धावेल.
नोकरी करणारे कर्मचारी, विमान व रेल्वेतून प्रवास करणारे नागरिक याबाबत सातत्याने मागणी करत होते. अखेरल महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (महा-मेट्रो) सेवा वाढवण्याचा निर्णय घेतला. सकाळी 6 वाजता पहिली मेट्रो धावती. तर वनाज-रामवाडी आणि पिंपरी-स्वारगेट मार्गांवरील रात्री 10 वाजता शेवटची मेट्रो धावते. मात्र, अतिरिक्त एक तासामुळे या दोन्ही मार्गावर दर 15 मिनिटांनी अशा चार अतिरिक्त फेऱ्या होतील.
वनाज-रामवाडी मार्गावर प्रवासासाठी सुमारे 37 मिनिटांचा वेळ लागतो, तर पिंपरी-स्वारगेट मार्गावर 34 मिनिटांचा वेळ लागतो. जवळपास दीड लाख नागरिक दररोज या दोन्ही मार्गावरून प्रवास करतात. सकाळी गर्दीच्या वेळी दर 7 मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असते. तर कमी गर्दीच्या वेळी दर 10 मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असते.
आता मेट्रो सेवेत 1 तास वाढ करण्यात आल्याने कामावरून उशिरा घरी परतणाऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.